पंतप्रधान मोदींच्या हस्ते दर्शन रांगेचे उद्घाटन होणार का?
तदर्थ समितीने दर्शन रांगेच्या उद्घाटनाला परवानगी दिली आहे. मात्र, हायकोर्टाने अद्याप परवानगी दिलेली नाही. साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी शिवा शंकर यांनी ही माध्यमांना माहिती दिली. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दर्शन रांगेचे उद्घाटन होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. साई संस्थानने भाविकांसाठी बांधलेली वातानूकुलित दर्शन रांग, शैक्षणिक संकुल, निळवंडे प्रकल्पाचे लोकार्पण आणि विमानतळ इमारतीचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. साई संस्थानवर कार्यरत असणाऱ्या तदर्थ समितीने उद्घाटन करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, हायकोर्टाने अद्याप परवानगी दिलेली नाही. उद्या हायकोर्टाने परवानगी दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा निश्चित होणार आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी जिल्हा प्रशासनाची बैठक घेत चोख नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आता हायकोर्ट दर्शन रांगेच्या उद्घाटनाची परवानगी देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
advertisement
वाचा - पंकजा मुंडे मुख्यमंत्री व्हाव्यात यासाठी कार्यकर्त्याचा अनोखा नवस, पाहा Video
साईसमाधी शताब्दी महोत्सवासाठी पंतप्रधान मोदी शिर्डीला आले होते. त्यानंतर आता पुन्हा 26 ऑक्टोबरला त्यांचा नियोजित दौरा आहे. त्यांच्या हस्ते निळवंडे धरण प्रकल्पाचे लोकार्पण, शिर्डी विमानतळाच्या विस्तारित इमारतीचे भूमिपूजन, साई संस्थानच्या शाळेचे उद्घाटन, महसूल भवन इमारतीचे भूमिपूजन, साईबाबा मंदिराच्या दर्शन रांगेचे उद्घाटन यासह राज्यातील काही रेल्वे प्रकल्पांचेही उद्घाटन होणार आहे. सोबतच केंद्रीय योजनांच्या लाभार्थ्यांना लाभाचे वाटपही होणार आहे. यासाठी किमान एक ते दीड लाख लोकांची गर्दी जमविण्याचे नियोजन आहे. सुमारे 30 ते 35 हजार लाभार्थ्यांनाही शिर्डीत आणले जाणार आहे.
