राज्यात सध्या साखर कारखान्यांमध्ये गाळप हंगाम सुरू असून ऊस तोडणीसाठी राज्यभरातून मजूर विविध ठिकाणी जातात. नेवासा तालुक्यातील पाथरवाला या गावात देखील इगतपुरी तालुक्यातून ऊस तोडणी मजूर महिनाभरापूर्वी आले होते. पंकज खाटीक या शेतमालकाकडे गेल्या महिन्याभरापासून हे मजूर काम करत होते. मजूर कामावर आल्यानंतर शेतमालकाने प्रत्येकी दोन हजार रुपये आगाऊ त्यांना दिल. मात्र, महिना उलटून गेल्यावरही पैसे मिळत नसल्याने या ऊस तोडणी मजुरांची उपासमार होऊ लागली. अखेर त्यांनी आपल्या गावी जाण्याचा निर्णय घेतला आणि गावावरून टेम्पो देखील आला. मात्र, ज्यावेळी मजूर आपल्या गावी जायला निघाले, त्यावेळेस शेतमालकाने त्यांचा टेम्पो अडवून त्यांना बाहेर जाऊ दिलं नाही.
advertisement
वाचा - अजेंडा महाराष्ट्राचा ! तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं, पाहायला विसरु नका संध्याकाळी 6 वाजता
सात तारखेला हा सगळा प्रकार घडल्यानंतर त्यातील एक मजूर पोलीस ठाण्यात देखील पोहोचला. मात्र त्या ठिकाणी फिर्याद न झाल्याने त्याला माघारी परतावा लागलं. या सगळ्या घटनेविषयी श्रमजीवी संघटनेचे संजय शिंदे यांनी अधिक माहिती दिली. या घटनेची माहिती श्रमजीवी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना कळताच त्यांनी तात्काळ नेवासा शहरात धाव घेतली व या मजुरांकडून हकीकत जाणून घेतली. यानंतर नेवासे पोलीस ठाण्यात शेतमालक पंकज खाटीक यांच्या विरोधात वेठबिगारी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर या सर्व ऊसतोडणी मजुरांना त्यांचे पैसे देऊन त्यांच्या गावी पाठवण्यात आलं असून अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. श्रमजीवी संघटनेच्या पाठपुराव्यामुळे या 21 मजुरांची सुटका झाली असून याप्रकरणी पोलिसांनी शेतमालक पंकज खाटीक याला अटक केली आहे. अद्यापही यातील एक आरोपी फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहे.
