गणेश होनराव (वय-२२) आणि रोहित साळुंखे (वय-२२) असं या दोन तरुणांची नावं आहेत. आधार कार्ड आणि कपड्यांवरून पोलिसांनी गणेश होनराव याची ओळख पटवली आहे. तर मोबाईल आणि कपड्यांवरून रोहित साळुंखेची ओळख पटवण्यात आली आहे. यातला रोहित साळुंखे पुण्यात इंजिनिअर म्हणून काम करत होता. तो मागच्या सहा महिन्यांपासून बेपत्ता होता. १८ जून रोजी तो हरिश्चंद्रगडावर ट्रेंकिंगसाठी गेला होता. त्याचवेळी तो १५०० फूट खोल दरीत पडला. हा प्रकार काही प्रत्यक्षदर्शींनी पाहिला होता. पण ते काहीच करू शकले नाहीत.
advertisement
रोहित बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी रोहितचा शोध घेतला, पण मुसळधार पाऊस आणि दाट धुकं यामुळे रोहिताचा मृतदेह सापडला नव्हता. तो कुठे पडलाय, याची ठोस माहिती पोलिसांकडे नसल्याने त्याचा मृतदेह शोधण्यात अनेक अडचणी येत होत्या. यानंतर पोलिसांनी मृतदेहाचा शोध थांबवलं होतं. पण अलीकडेच रोहित साळुंखे याच्या कुटुंबीयांनी रोहितचा मृतदेह शोधण्यासाठी पोलिसांना विनंती केली. या विनंतीवरून पोलिसांनी एका ट्रेकर्स ग्रुपच्या मदतीने शोधमोहीम राबवली. गुरुवारी (१२ डिसेंबर) पासून ही शोधमोहीम सुरू होती. अथक प्रयत्नानंतर ट्रेकर्स ग्रुपला रोहितचा सांगाडा आढळला. मोबाईल फोन आणि कपड्याच्या आधारे रोहितची ओळख पटवण्यात आली.
ही शोधमोहीम सुरू असताना ट्रेकर्स ग्रुपला आणखी एक सांगाडा सापडला. सांगाड्याच्या खिशात आधारकार्ड आणि पॅनकार्ड होतं. त्यानुसार मृत तरुण गणेश होनराव असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तो मुळचा लातूर जिल्ह्याच्या रहिवासी होता. गणेश तीन वर्षांपूर्वी घरातून निघून गेला होता. तो बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या घरच्यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पण गणेशचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता. घरातून निघून गेल्यानंतर गणेशनं हरिश्चंद्रगडावर येऊन आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. पोलीस दोन्ही घटनांचा तपास करत आहेत. दोघांचे डीएनए नमुने तपासासाठी पाठवण्यात आले आहेत. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहे.
