गणेशोत्सवात सर्जनशीलता आणि भक्तिभावाचा संगम बघायला मिळतो. प्रत्येकजण आपल्या पद्धतीने गणरायाची पूजा करतो आणि सजावटीतून आपला दृष्टिकोन व्यक्त करतो. ऐश्वर्या जाधव यांनी यंदा देशातील एक महत्त्वाची घटना असलेल्या ऑपरेशन सिंदूरवर आधारित देखावा तयार करण्याचा निर्णय घेतला. हा देखावा तयार करण्यासाठी 10 दिवसांचा कालावधी लागला. कार्डबोर्डसारख्या पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करून हा देखावा साकारण्यात आला आहे. प्रत्येक घटक अत्यंत बारकाईने तयार करण्यात आला असून, युद्धभूमीवरील दृश्ये, भारतीय जवानांची तयारी, ऑपरेशनमध्ये वापरलेलं शस्त्रास्त्र यांची प्रतिकृती बनवण्यात आली आहे.
advertisement
Ganeshotsav 2025: कळव्यात अवतरली काशी! चित्ते कुटुंबाचा गणपती देखावा ठरतोय चर्चेचा विषय, VIDEO
ऐश्वर्या जाधव म्हणाल्या, "भारताने 'ऑपरेशन सिंदूर' यशस्वीपणे पूर्ण केलं. पाकिस्तानी लोकांकडून होणारे दहशतवादी हल्ले थांबवण्यासाठी हे उत्तर देणं गरजेचं होते. तेच आम्ही या देखाव्याच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे या ऑपरेशनचं नेतृत्व महिलांनी केलं होतं. ऑपरेशन दरम्यान महिला अधिकाऱ्यांनी दाखवलेलं शौर्य देखावाच्या रुपात दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे."
गणेशोत्सव हा केवळ धार्मिक नाही तर सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्यांना पुढे नेणारा उत्सव मानला जातो. त्यामुळे दरवर्षी विविध सामाजिक, ऐतिहासिक आणि राष्ट्रीय विषयांवर देखावे तयार करण्याची परंपरा आहे. ऐश्वर्या यांच्या घरातील देखावा भाविकांसाठी आकर्षणाचा विषय ठरला आहे. विशेषतः लहान मुलांना आणि तरुणांना भारतीय सैन्याची ताकद आणि त्याग याविषयी जागरूकता निर्माण करण्याचा हेतू यातून पाहिला मिळतो. कार्डबोर्ड, रंगीत कागद आणि विविध लहान मॉडेल्सचा वापर करून उभारलेला हा देखावा खऱ्या युद्धभूमीची अनुभूती देतो.
हा देखावा पाहण्यासाठी एरंडवणे परिसरातील रहिवासी आणि गणेशभक्त मोठ्या संख्येने येत आहेत. सोशल मीडियावरही या देखाव्याचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक परंपरा जपणारा उत्सव नसून, समाजात सकारात्मक विचारांचं बीजं पेरण्याचे एक माध्यम आहे, हाच संदेश ऐश्वर्या यांनी देखाव्यातून दिला आहे.