पहाटेपासूनच कामाला सुरूवात करणारा नेता, म्हणून महाराष्ट्र अजित पवारांना ओळखतो. आपल्या नियमित दिनचर्येप्रमाणे अजितदादांनी आज सकाळपासून कामाला सुरूवात केली. बारामतीला जाताना अजितदादांसोबत अनेक फाईल आणि कागदही होते. अपघातानंतर अजितदादांचं विमान जळून खाक झालं, तर त्यांच्यासोबत असलेले कामाचे कागद हे विमान कोसळलं त्या माळरानावर अस्ताव्यस्त पसरले.
advertisement
बारामतीमध्ये ज्या ठिकाणी अजितदादांच्या विमानाचा अपघात झाला, त्याचा एरियल फोटो आता समोर आला आहे, या फोटोमध्ये माळरानावर जळलेल्या अवस्थेतील विमानाचे अवशेष आणि आजूबाजूला पसरलेले कागद दिसत आहेत.
सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास अजित पवार हे बारामतीला जाण्यासाठी मुंबईहून निघाले, त्यानंतर 8 वाजून 45 मिनिटांच्या आसपास विमानाने बारामती विमानतळावर एकदा लॅन्डिंगचा प्रयत्न केला, पण यात पायलटला यश आलं नाही. धुक्यामुळे कमी व्हिजिबिलिटी असल्याने पायलटला विमान उतरवताना अडचणी आली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे, पण विमानाचा ब्लॅक बॉक्स उघडल्यानंतरच अपघाताचं खरं कारण समोर येईल.
अजितदादांवर गुरूवारी अंत्यसंस्कार
अजित पवारांवर गुरूवारी सकाळी 11 वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अंत्यसंस्कारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. आज संध्याकाळी 5 वाजेनंतर अजित पवारांचं पार्थिव बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. अजित पवारांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रामध्ये 28 ते 30 जानेवारी असा 3 दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
