काय आहे पोस्ट?
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले आहे की, ''महाराष्ट्राच्या राजकारणात आता दादा नसतील ही जाणीवच अंगावर काटा आणणारी आहे. कामाचा प्रचंड आवाका आणि उरक असणारा हा लोकप्रिय लोकनेता नियतीने आज आपल्यापासून हिरावला.प्रत्येक ठिकाणी वेळेत जाणारे दादा आज चुकीच्या वेळी गेले…! अधिक लिहवत नाही.शब्द अपुरे आहेत आणि भावना गोठल्या आहेत.पवार कुटुंबियांच्या या दुःखद प्रसंगात आम्ही सहभागी आहोत. असं त्यांनी म्हंटलं आहे.
advertisement
अपघात नेमका कसा घडला?
विमान बारामती परिसरात दाखल झाले तेव्हा परिसरात प्रचंड दाट धुके पसरले होते. धावपट्टी स्पष्टपणे दिसत नसल्यामुळे लँडिंग करणे अत्यंत कठीण बनले होते. विशेष म्हणजे बारामतीसारख्या लहान विमानतळावर इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम (ILS) उपलब्ध नसल्याने पायलटला पूर्णतः दृष्टीआधारित म्हणजेच मॅन्युअल पद्धतीने विमान उतरवावे लागते. मात्र दाट धुक्यामुळे धावपट्टीचा अंदाज येत नसतानाही पायलटने पहिल्यांदा लँडिंगचा प्रयत्न केला.
हा पहिला प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर विमान पुन्हा आकाशात झेपावले. त्यानंतर पायलटने विमानाला मोठी घिरटी घालून पुन्हा धावपट्टीचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला आणि दुसऱ्यांदा लँडिंगसाठी विमान खाली आणले. दुसऱ्या प्रयत्नात विमान सुरक्षितपणे उतरेल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती.
मात्र तज्ज्ञांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, दुसऱ्या लँडिंगदरम्यान विमान थेट धावपट्टीवर न उतरता मार्ग चुकून बाजूला गेले. पायलटने विमान पुन्हा धावपट्टीकडे वळवण्याचा प्रयत्न केला, पण काही सेकंदांतच परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. अवघ्या चार ते पाच सेकंदांत विमानाला भीषण स्फोट होऊन मोठा अपघात झाला.
ज्या विमानतळांवर ILS प्रणाली उपलब्ध नसते, तिथे वैमानिकांना डोळ्यांनी पाहूनच धावपट्टीचा अंदाज घ्यावा लागतो. मात्र सकाळच्या वेळेस असलेल्या दाट धुक्यामुळे हा अंदाज घेणे अत्यंत अवघड झाले. पहिल्या लँडिंगचा प्रयत्न फसल्यानंतर दुसऱ्यांदा प्रयत्न करण्यात आला, पण तोही यशस्वी ठरला नाही. या दुर्दैवी अपघातात अजित पवार यांच्यासह विमानातील पाच जणांचा मृत्यू झाला
