बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानात अजित पवार यांच्यावर गुरूवारी सकाळी ११ वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील. अजित पवार यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भारत सरकारमधील अनेक केंद्रीय मंत्री, महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासहित राज्यातले सगळेच मंत्री, लोकप्रतिनिधी उपस्थित असतील.
advertisement
शासकीय दुखवट्याच्या तीन दिवसांच्या कालावधीत महाराष्ट्रातील ज्या इमारतींवर नियमितपणे राष्ट्रध्वज फडकविण्यात येतो, त्या सर्व ठिकाणी राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येईल. तसेच या कालावधीत कोणतेही शासकीय मनोरंजन कार्यक्रमांचे आयोजित होणार नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनामुळे बुधवार, दिनांक २८ जानेवारी २०२६ रोजी राज्यातील सर्व राज्य शासकीय कार्यालये बंद राहतील, असे कळविण्यात आले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना घेता येणार आहे. आज सायंकाळी पाच वाजल्यापासून अजित पवार यांचे पार्थिव बारामती येथील विद्या प्रतिष्ठान शाळेत ठेवण्यात येणार आहे. अजित पवार यांना अखेरची श्रद्धांजली अर्पण करता यावी, यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान, परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, सर्वांनी शांतता आणि शिस्त पाळण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
