Tandoor Vada Pav : प्रसिद्ध तंदूर वडापाव, 30 रुपयांत चाखा मुंबईत इथं चव, खवय्यांची असते मोठी गर्दी
- Reported by:Bhavna Arvind Kamble
- Published by:Mohan Najan
Last Updated:
येथे मिळणारा तंदूर वडापाव अल्पावधीतच खवय्यांचा आवडता ठरला असून सोशल मीडियावरही तो चांगलाच व्हायरल होत आहे.
मुंबई : मुंबईची ओळख असलेला वडापाव शहराच्या प्रत्येक कोपऱ्यात सहज मिळतो. मात्र प्रभादेवी परिसरात सध्या एका वेगळ्याच प्रकारच्या वडापावची जोरदार चर्चा सुरू आहे. येथे मिळणारा तंदूर वडापाव अल्पावधीतच खवय्यांचा आवडता ठरला असून सोशल मीडियावरही तो चांगलाच व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे हा तंदूर वडापाव केवळ 30 रुपयांत उपलब्ध आहे.
नेहमीच्या वडापावपेक्षा पूर्णपणे वेगळा अनुभव देणारा हा प्रकार तंदूरमध्ये भाजून तयार केला जातो. गरमागरम पाव, तंदूरमध्ये भाजलेला वडा, त्यावर खास मसाले आणि वेगवेगळ्या सॉसेस यामुळे या वडापावची चव इतर वडापावपेक्षा खास ठरते. या तंदूर वडापावमध्ये मेयोनीज, तंदूर मेयोनीज, खास मसाले, वेफर्स आणि तंदूरमध्ये भाजलेला वडा वापरला जातो. त्यामुळे प्रत्येक घासात वेगळीच चव अनुभवायला मिळते.
advertisement
या स्टॉलवर केवळ तंदूर वडापावच नव्हे तर इतरही अनेक आकर्षक पर्याय उपलब्ध आहेत. येथे मिळणारा तंदूर चीज वडापाव सध्या विशेष लोकप्रिय असून त्याची किंमत 50 रुपये आहे. या वडापावमध्ये भरपूर चीज वापरले जात असल्याने चीजप्रेमींना विशेष पसंती मिळत आहे. तसेच ठेचा वडापाव हा आणखी एक लोकप्रिय प्रकार असून त्यातील ठेचा स्टॉलवरच स्वतः तयार केला जातो. या ठेचा वडापावची किंमत केवळ 20 रुपये आहे. याशिवाय बटर वडापाव 25 रुपयांना उपलब्ध आहे. या स्टॉलचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे मिळणारा युनिक पदार्थ वॅफर पाव. वेफर्सचा वापर करून तयार केलेला हा पदार्थ खवय्यांना नवा अनुभव देतो आणि त्याची किंमत 30 रुपये आहे.
advertisement
हा वडापावचा स्टॉल प्रभादेवी स्टेशनपासून फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर, टिळक भवनसमोर, एसबीआय बँकेच्या अपोजिट आहे. कमी किमतीत हटके आणि स्वादिष्ट वडापाव मिळत असल्याने तरुणांसह सर्व वयोगटातील वडापावप्रेमी येथे मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत. प्रभादेवीतील हा तंदूर वडापाव सध्या मुंबईच्या खाद्यसंस्कृतीत नवी ओळख निर्माण करत असल्याचे चित्र दिसत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 28, 2026 3:58 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Tandoor Vada Pav : प्रसिद्ध तंदूर वडापाव, 30 रुपयांत चाखा मुंबईत इथं चव, खवय्यांची असते मोठी गर्दी








