खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनेत्रा पवार, पार्थ पवार हे बारामती विमानतळावर दाखल झाल्यानंतर त्या ठिकाणी शरद पवार यांचे पुण्यातील सहकारी मित्र विठ्ठल शेठ मणियार उभे होते. त्यांना पाहून सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर झाले. त्यांनी त्यांची गळाभेट घेतली.
पवार कुटुंब धायमोकलून रडलं
दादा तुमचा अतिशय लाडका होता... असे म्हणत सुप्रिया सुळे या विठ्ठल शेठ मणियार यांच्या गळ्यात पडून रडल्या. यावेळी सुनेत्रा पवार यांनाही अश्रू अनावर झाले. त्या देखील विठ्ठल शेठ मणियार यांच्या गळ्यात पडून रडल्या. पवार कुटुंबाला दवाखान्याकडे घेऊन जाण्यासाठी विमानतळावर राणा जगजितसिंह पाटील आलेले होते. त्यांना पाहून सुनेत्रा पवार यांनी धायमोकलून रडायला सुरुवात केली. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, शिवसेना नेते, मंत्री दादा भुसेही तिथे उपस्थित होते.
advertisement
सुनेत्रा पवार रुग्णालयात, कार्यकर्ते प्रचंड भावूक, अजितदादा 'अमर रहे'च्या घोषणा
सुनेत्रा पवार, पार्थ पवार दुपारी अडीच वाजता बारामती रुग्णालयात पोहोचले. यावेळी कार्यकर्ते प्रचंड भावुक झाले होते. 'अजित पवार अमर रहे'च्या घोषणांनी रुग्णालय परिसर दुमदुमून गेला होता. शेकडो कार्यकर्ते धायमोकलून रडत होते. कार्यकर्त्यांना पाहून सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे देखील रडल्या.
महाराष्ट्रात तीन दिवसांचा शासकीय दुखावटा
महाराष्ट्रात २८ ते ३० जानेवारी २०२६ या तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, असे सामान्य प्रशासन विभाग (राजशिष्टाचार) विभागामार्फत कळविण्यात आले आहे.
