Ajit Pawar : ‘तुझी भीती होती, पण तू निवडून आलीस’,10 दिवसांपूर्वीच झाली होती अजितदादांची भेट; वर्षा यांना अश्रू अनावर
- Reported by:Pooja Satyavan Patil
- Published by:Mohan Najan
Last Updated:
अजित दादांच्या पक्षातून पहिल्यांदाच निवडून आलेल्या नगरसेविका वर्षा जगताप यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
पुणे: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी बारामती येथे विमान अपघातात दुःखद निधन झाले. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात शोककळा पसरली असून सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत आपली सत्ता प्रस्थापित करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली होती. जनतेची सेवा हाच ध्यास ठेवून पक्षाची पुन्हा सत्ता यावी, यासाठी त्यांनी शरद पवार यांच्या पक्षाशी असलेली राजकीय कटुता बाजूला ठेवत महापालिका निवडणुकीसाठी युती केली.
आपल्या उमेदवारांच्या विजयासाठी अजित दादांनी अनेक प्रचारसभा घेतल्या. या सभांमधून त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा एकदा आपली ताकद सिद्ध करण्यासाठी त्यांनी पूर्ण ताकदीनिशी प्रचार केला होता. दरम्यान, अजित दादांच्या पक्षातून पहिल्यांदाच निवडून आलेल्या नगरसेविका वर्षा जगताप यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
advertisement
पिंपरी-चिंचवड येथील संत तुकाराम नगर प्रभाग क्रमांक 20 मधून निवडून आलेल्या नगरसेविका वर्षा जगताप यांनी अजितदादा पवार यांच्या निधनावर तीव्र दुःख व्यक्त केल आहे. अजितदादा आपल्याला सोडून गेले, यावर अजूनही विश्वास बसत नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने अजितदादांशी अतिशय जवळचा संबंध आला होता. या निवडणुकीसाठी त्यांनी आम्हाला मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांच्यामुळेच मला या निवडणुकीत यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले. अजितदादा कायम लहान-मोठ्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असत. जिथे चूक होत असे तिथे योग्य वाट दाखवत असत, अशा शब्दांत त्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
advertisement
10 दिवसांपूर्वीच भेट झाली होती..
दहा दिवसांपूर्वीच अजितदादांची भेट झाल्याची आठवण नगरसेविका वर्षा जगताप यांनी सांगितली. त्यांनी सांगितले की, दहा दिवसांपूर्वी अजितदादांनी आम्हा नगरसेवकांची बैठक घेतली होती. या बैठकीदरम्यान अजितदादांनी माझं नाव घेत म्हणाले,वर्षा, मला तुझी भीती होती पण तू निवडून आलीस, याचं समाधान आहे. हे शब्द आजही कानात घुमत असल्याचं सांगत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 28, 2026 8:27 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Ajit Pawar : ‘तुझी भीती होती, पण तू निवडून आलीस’,10 दिवसांपूर्वीच झाली होती अजितदादांची भेट; वर्षा यांना अश्रू अनावर






