अजित पवारांच्या विमान अपघाताच्या कारणांवर चर्चांना उधाण आले आहे. खराब हवामान, तांत्रिक उणिवा आणि जुन्या चुकांकडे केलेले दुर्लक्ष ही या भीषण दुर्घटनेची प्रमुख कारणे असल्याचे प्राथमिकदृष्ट्यात दिसत असल्याचे सांगण्यात येत आहे.
वैमानिकाची ती चूक महागात?
मिळालेल्या माहितीनुसार, बारामतीला पोहोचल्यानंतर दाट धुक्यामुळे वैमानिकाला धावपट्टी दिसत नव्हती. विमानाने एकदा 'गो-अराउंड' (पुन्हा उड्डाण) करून लँडिंगचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरला. दुसऱ्यांदा लँडिंग करताना एटीसीने (ATC) वैमानिकाला स्वतःच्या निर्णयानुसार (Discretion) लँडिंग करण्याचा सल्ला दिला होता. धावपट्टी दिसत नसतानाही लँडिंगचा प्रयत्न केल्याने विमान खड्ड्यात आदळले आणि मोठा अनर्थ घडला.
advertisement
डीजीसीएनं त्यावेळी दिली होती वॉर्निंग?
या विमान कंपनीच्या 'लिअरजेट ४५' विमानाचा १४ सप्टेंबर २०२३ रोजी मुंबई विमानतळावर असाच अपघात झाला होता. त्यावेळी ८ जण सुदैवाने वाचले होते. मात्र, तेव्हा डीजीसीएने कडक कारवाई करण्याऐवजी कंपनीला केवळ 'तंबी' देऊन सोडले होते. जर त्याच वेळी कठोर पाऊल उचलले असते, तर आजची दुर्घटना टळली असती का? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
विमानाचे ऑडिट आणि 'ओव्हरवर्क'
अपघातग्रस्त विमानाचे शेवटचे ऑडिट फेब्रुवारी २०२५ मध्ये झाले होते. त्यानंतर विमानाचा परवाना २०२८ पर्यंत वैध होता. विशेष म्हणजे, या विमानाने गेल्या दोन दिवसांत सुरत ते मुंबई दरम्यान तीन वेळा प्रवास केला होता. विमानावर कामाचा ताण अधिक होता का, याचीही आता चौकशी होत आहे.
अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅकबॉक्स हाती, 'डिकोड' कधी होणार?
अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅकबॉक्स सापडला असून अपघातचं कारण उलगडण्याची शक्यता आहे. ब्लॅक बॉक्स आता डिकोड करण्यात येणार आहे फ्लाइट डेटा रेकॉर्डरमुळे (FDR) विमानाचा वेग, उंची आणि इंधनाची माहिती मिळणार आहे. तर, कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरमुळे (CVR) वैमानिकांमधील शेवटच्या क्षणांचे संभाषण समोर येईल. हा डेटा डिकोड करण्यासाठी किमान ३ ते ४ आठवड्यांचा कालावधी लागणार असून त्यानंतरच अपघाताचे नेमके तांत्रिक कारण स्पष्ट होईल.
