वरळीच्या सेंच्युरी मिल परिसरात राहणाऱ्या पिंकीच्या निधनाने संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली असतानाच, या अपघातामागे कंपनीचा निष्काळजीपणा असल्याचा गंभीर आरोप होऊ लागले आहेत. डीजीसीएने या अपघाताच्या चौकशीचे निर्देश दिले आहेत. अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला असून आता पुढील कार्यवाही सुरू आहे.
दोन महिन्यापूर्वी पिंकीने दिली होती बिघाडाची कल्पना...
पिंकी माळी यांचा भाऊ करण याने 'दिव्य मराठी' सोबत बोलताना खळबळजनक खुलासा केला आहे. करण माळी यांनी सांगितले की, साधारण दोन महिन्यांपूर्वी एका उड्डाणादरम्यान मोठा अपघात होता होता टळला होता. त्यावेळी विमानातील तांत्रिक त्रुटी (Technical Glitches) आणि वैमानिकांचा अननुभवीपणा याबद्दल पिंकीने कुटुंबाकडे चिंता व्यक्त केली होती. खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही त्यावेळच्या विमान प्रवासातील त्रुटींबाबत नाराजी व्यक्त केल्याचे समोर येत आहे. त्यामुळे वारंवार सूचना देऊनही कंपनीने विमानांच्या देखभालीकडे दुर्लक्ष केले का? असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.
advertisement
वडिलांचा शब्द पाळला, पण नियतीने घात केला
पिंकीला मॉडेलिंग क्षेत्रात करिअर करायचे होते, मात्र वडील शिवकुमार यांच्या आग्रहाखातर तिने एअर होस्टेस होण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी सकाळी जेव्हा ती कामावर निघाली, तेव्हा "आज अजित पवार यांच्या फ्लाईटमध्ये माझी ड्युटी आहे," असे तिने अभिमानाने वडिलांना सांगितले होते. "मी नांदेडला जातेय" असे म्हणून घरातून पडलेली पिंकी आता कधीच परतणार नाही, या विचाराने तिचे वडील कोलमडून पडले आहेत.
विमान कंपनीने काय म्हटले?
अजितदादांच्या विमानाचा अपघात झाल्यानंतर विमान दुरुस्त नसल्याची चर्चा सुरू झाली. विमानाच्या फिटनेसवरही सवाल उपस्थित होऊ लागले होते. या सगळ्या चर्चांवर व्ही.के. सिंह यांनी भाष्य केले. व्ही. के. सिंह म्हणाले की, "आमच्या माहितीनुसार आणि रेकॉर्डनुसार, हे विमान तांत्रिकदृष्ट्या पूर्णपणे तंदुरुस्त (Fit) होते. उड्डाणापूर्वी सर्व आवश्यक सुरक्षा चाचण्या पूर्ण करण्यात आल्या होत्या. त्यामुळे तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाला असावा, असे प्राथमिकदृष्ट्या वाटत नाही."
त्यांनी पुढे म्हटले की, प्राथमिक माहितीनुसार, लँडिंगच्या वेळी त्या परिसरात दृश्यमानता (Visibility) अत्यंत कमी होती. धुक्यामुळे किंवा खराब हवामानामुळे वैमानिकाला धावपट्टीचा अंदाज आला नसावा, असा आमचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण काय होते, हे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (DGCA) चौकशीनंतरच स्पष्ट होईल," असे सिंह यांनी स्पष्ट केले.
