खरं तर मागच्या सात वर्षापासून पीएसओ विदीप जाधव हे अजित पवार यांचे अंगरक्षक म्हणून त्यांच्यासोबत सावलीसारखे होते.त्यामुळे बुधवारी ते देखील अजित दादांसोबत विमानाने बारामतीत निघाले होते. या दरम्यान विमान कोसळून अजित पवार आणि त्यांचे अंगरंक्षक विदीप जाधव यांच्यासह आणखी तिघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर बुधवारी रात्री विदिप जाधव यांच्यावर त्यांच्या सातार्यातील मूळ गावी तरडगाव येथे रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी त्याच्या 9 वर्षाच्या मुलाने त्यांना मुखाग्नी दिला होता. हे दृष्य पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले होते. कारण ज्या वयात त्याचं बापाच्या आंगाखांद्यावर खेळायच वय होतं,त्या वयात त्याला बापाला मुखाग्नी द्यावा लागला होता.
advertisement
दरम्यान शासकीय सन्मानात पार पडलेल्या या अंत्यविधीत कुटुंबीय, सहकारी, अधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसरात शोकमय वातावरण होते.
कोण होते विदीप जाधव?
महाराष्ट्राच्या पोलीस दलात विदीप जाधव हे 2009 मध्ये दाखल झाले होते. चोख काम करण्याची पद्धत आणि शिस्त यामुळे विदीप यांना अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या मिळाल्या होत्या. न्यायाधीश जे.एन.सानप यांचे अंगरक्षक म्हणून विदीप यांनी 2010 ते 2013 या काळात काम केले.त्यानंतर 2014 ते 2019 या कालावधीत त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षा पथकात उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्यानंतर 2019 पासून विदीप जाधव आज अखेर अजित पवार यांच्यासोबत सावलीसारखे होते.
