मंचर नगर पंचायतीच्या निवडणूक प्रचारासाठी अजित पवार यांची मंचर येथे सभा घेतली. या सभेत बोलत असताना अजित पवार यांनी मंचरमधील राष्ट्रवादी काँग्रेस-भाजप युतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मोनिका बाणखेले-बेंडे यांची ओळख करून देताना त्यांचे माहेरही मंचर असल्याचे आणि सासरही मंचरच असल्याचं सांगितलं. यानंतर त्यांनी मोनिका बाणखेले यांच्याकडून पाहून तुमचं लव्ह मॅरेज आहे का? असा मिश्किल प्रश्न विचारला. यानंतर व्यासपीठावर एकच हशा पिकला.
advertisement
अजित पवार नक्की काय म्हणाले?
नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मोनिका बाणखेले यांची ओळख करून देताना अजित पवार म्हणाले, "आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मोनिकाताई सुनील बाणखेले आहेत. त्या पूर्वीच्या बेंडे आहेत. हा तुमचा उमेदवार फार फायदेशीर आहे. कारण त्या पूर्वीच्या बेंडे आहेत. मोनिकाताईंचं माहेरही इथंच आहे आणि सासरही इथेच आहे."
यानंतर अजित पवारांनी मागे वळून व्यासपीठावर बसलेल्या मोनिका बाणखेले यांना 'मग लव्ह मॅरेज आहे का?' असा मिश्किल सवाल विचारला. यानंतर त्यांनी "सासर आणि माहेर एकच असलं की जरा शंकेला जागा उरते, पण हरकत नाही, काही वाईट वाटून घ्यायचं कारण नाही", असं म्हणत पुन्हा भाषणाच्या मुद्द्यावर आले. अजित पवारांच्या भाषणातील ही क्लिप आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
