शरद पवार गटाचे काही आमदार अजित पवार यांच्या संपर्कात आहेत, या वृत्ताने राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ माजली होती. बुधवारी अजित पवार छत्रपती संभाजीनगला एका खासगी कार्यक्रमाच्या निमित्ताने आले होते. त्यावेळी पत्रकारांनी त्यांनाच याचविषयी विचारले.
शरद पवार गटाचे आमदार संपर्कात आहेत का?
शरद पवार गटाचे किती आमदार तुमच्या संपर्कात आहेत, असे विचारले असता, निकाल लागून फक्त तीन दिवस झाले. अजून कशातच काही नाही. मात्र काही जण बातम्या पसरवण्याचा प्रयत्न करीत आहेत. निवडून आलेल्यांपैकी माझ्या संपर्कात कोणीही नाही, असे स्पष्टपणे अजित पवार यांनी सांगितले. एकप्रकारे अनिल पाटील यांचा दावा अजित पवार यांनी थेटपणे खोडून काढला.
advertisement
निवडून आलेल्या आमदारांची मते जाणून घेतली. मुंबईत झालेल्या बैठकीत त्यांच्याशी दीर्घ चर्चा केली. विजयी आमदारांना मतदारसंघात जायला सांगून जनतेला धन्यवाद देण्यासाठी आभार दौरा आखण्याच्या सूचना आमदारांना दिल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
आमदार अस्वस्थ, आमच्याशी संपर्क साधायला सुरुवात, अनिल पाटील काय म्हणाले होते?
राज्यात महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला आहे. त्यामुळे विरोधी पक्षातल्या अनेक आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. त्यातील काही लोकांशी आमचे जवळचे संबंध असल्याने सत्तागटात येण्यासाठी ते इच्छुक असल्याचे त्यांनी आम्हाला सांगितले. शरदचंद्र पवार पक्षाचे काही आमदार तसेच काँग्रेस पक्षाचे काही लोक आमच्या संपर्कात असून पुढील काहीच दिवसांत त्यांची भूमिका ते स्पष्ट करतील, असे अनिल पाटील यांनी निकालानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले होते.
