अजित पवार यांच्या अकाली एक्झिटने सगळेच धक्क्यात असतानाच त्याच्या अंत्यसंस्कारादरम्यान एक अत्यंत भावूक करणारी घटना समोर आली आहे. त्याचं झालं असं की बुधवारी सकाळी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामतीकडे येत असताना अजित पवारांच्या विमानाला भीषण अपघात झाला होता.या अपघातात त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर त्यांचे पार्थिव ज्या रुग्णवाहिकेतून रुग्णालयातून स्मशानभूमीपर्यंत नेण्यात आले होती. ती रुग्णवाहिका स्वत: अजित पवार यांनीच जनतेच्या सेवेसाठीच अवघ्या सहा महिन्यांपूर्वी बारामती नगरपरिषदेला भेट दिली होती. पण ज्या लोकनेत्याने जनतेच्या सेवेसाठी ही गाडी उपलब्ध करून दिली, त्याच गाडीतून त्यांना शेवटचा निरोप दिला जाईल,असे कुणाला वाटले देखील नव्हते.
advertisement
दरम्यान नुसत रुग्णवाहिकाच नाही तर ही गाडी हाकण्यासाठी चालक देखील अजित पवार यांनीच बसवला होता. त्यामुळे अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती नगरपरिषदेचे रुग्णवाहिका चालक नाझीम काझी यांच्यासाठी हा प्रवास आयुष्यातील सर्वात जड आणि दुखाचा होता. या घटनेबद्दल सांगताना काझी यांच्या डोळ्यात अश्रू आले होते.
सुमारे सहा महिन्यांपूर्वी बारामती नगरपरिषदेकडे दशकाहून अधिक जुनी रुग्णवाहिका असल्याचे अजित पवारांच्या निदर्शनास आले होते. त्यावर तातडीने उपाययोजना करत, दादांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कोणतीही दिरंगाई न करता आधुनिक सोयींनी सज्ज अशी नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली दिल्याचे काझी यांनी सांगितले. इतकेच नव्हे तर काही वर्षांपूर्वी नाझीम काझी यांनी नोकरीसाठी मदत मागितली होती, तेव्हा अजित पवारांनीच त्यांना नगरपरिषदेच्या रुग्णवाहिका चालकाची नोकरी लावल्याचेही त्यांनी सांगितले.
जेव्हा आजीत दादांनी ही रुग्णवाहिका सोपवली तेव्हा त्यांनी मला फक्त एकच गोष्ट सांगितली, 'तुमचेकाम पूर्ण प्रामाणिकपणे करा'. त्यांचा आवाज आजही माझ्या कानात घुमतो आहे. मला कल्पनाही नव्हती की त्यांनी मला जीव वाचवण्यासाठी जे वाहन दिले होते त्याच वाहनातून मला त्यांचे पार्थिव न्यावे लागेल. हा माझ्या आयुष्यातील सर्वात दुःखद क्षण आहे, हे सांगताना काझींना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.
