राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजपच्या कारभारावर बोट ठेवत स्थानिक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. मात्र त्या आरोपांना उत्तर देण्याऐवजी, आम्ही पुस्तकाची मागील पानं पलटली तर अजित पवारांना बोलताही येणार नाही, असे म्हणत भाजपचे ज्येष्ठ नेते, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवार यांच्यावर पलटवार केला. त्यानंतर अजित पवार यांनी राजकीय शहाणपण दाखवून नरमाईची भूमिका घेतली.
advertisement
अजित पवार यांचे एक पाऊल मागे
भाजपसोबतच्या राजकीय संघर्षावर विचारले असता अजित पवार यांनी अत्यंत सावधपणे प्रतिक्रिया दिली. मी स्थानिक नेत्यांवर आरोप केले होते. किंबहुना मी पुरावे देखील दिले. वरिष्ठ भाजप नेत्यांबद्दल मी कोणताही आरोप केला नाही किंवा टीका केली नाही. केंद्रात आणि राज्यातले एनडीए सरकार अत्यंत व्यवस्थित काम करीत आहे. परंतु माध्यमांनी मी वरिष्ठ भाजप नेत्यांवर आरोप केले, असे चित्र बातम्यांमधून उभे केले, असे सांगत भाजपसोबतच्या संघर्षात अजित पवार यांनी एक पाऊल मागे घेतले.
....म्हणून अजित पवार यांनी मवाळ भूमिका घेतली
अजित पवार यांनी विचार करून बोलावे. तसेच ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्यांसोबतच मी सत्तेत बसलोय, हे सांगणे भूषणावह नाही, असे सुनावत न्यायालयाचा निकाल अद्याप बाकी असल्याची आठवण बावनकुळे यांनी करून दिल्यावर अजित पवार यांनी मवाळ भूमिका घेतल्याची चर्चा आहे.
भाजपला नेमकी तीच गोष्ट खटकली!
पुणे आणि पिंपरी चिंचवड ही दोन्ही शहरं खरं तर पवारांचा बालेकिल्ला. परंतु २०१७ च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दोन्ही शहरांवर कब्जा मिळवला. राष्ट्रवादीच्या ताब्यातून दोन्ही महापालिका हिसकावून भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला. बालेकिल्ला हातून गेल्याची रूखरूख अजित पवार यांना लागून राहिली आहे. आता तोच बालेकिल्ला पुन्हा मिळविण्यासाठी अजित पवार कंबर कसून कामाला लागले आहेत. याची सुरुवात त्यांनी स्थानिक भाजप नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून केली. मात्र हीच गोष्ट भाजपला खटकली आहे.
