नगरपरिषद आणि नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या निमित्ताने अजित पवार यांनी फुरसुंगी येथे राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेतली. यावेळी तेथील नागरी समस्यांवर बोलताना स्थानिक नेत्यांना त्यांनी सुनावले. एवढी प्रचंड दुरावस्था झालेली असतानाही तुम्ही काहीच कसे केले नाही, असा सवाल त्यांनी केला.
पुण्यातल्या सभेत अजित पवार स्वत:वरच संतापले
इथली दुरावस्था बघून माझी मलाच लाज वाटली. काय ते रस्ते? तुम्ही येथे राहताच कसे..? मला लाज वाटते मी तुमचा पालकमंत्री आहे. ही परिस्थिती बदलली पाहिजे. आमच्या उमेदवारांना निवडून द्या, इथली परिस्थिती बदललेली दिसेल, असे अजित पवार म्हणाले.
advertisement
तुम्हाला वाटतं पुढारीपण लई भारी...!
आमचा उमेदवार लईच जाड दिसतोय आता नगराध्यक्ष झाला की असा काडी होशील. तुम्हाला वाटतं पुढारीपण लई भारी पण काम करायला लागल्यावर किती कष्ट घ्यावे लागतात. सामान्यांसाठी किती पळावं लागतं हे त्यालाच माहिती असतं, असे अजित पवार म्हणाले.
काहींनी सांगितलं होतं की इथे नगरपालिका करा
मागच्या काळात आपण महानगरपालिकेत गेलो होतो. पण काहींनी सांगितलं की इथे नगरपालिका करा. पुढचे ५० वर्ष डोळ्यासमोर ठेवून निर्णय घ्यायचे, ही शिकवण पवारसाहेबांनी आम्हाला दिली. त्यानुसार आपण निर्णय घेतो, असे अजित पवार म्हणाले.
माझा उमेदवारच नगराध्यक्षपदासाठी जास्त लायक
फुरसुंगीकरांनो, संतोष सरोदे हा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जास्त योग्य, लायक आहे. त्याने राष्ट्रवादीत गेली २५ वर्ष काम केले आहे. त्याच्या पुढे प्रश्न खूप आहेत. मग तुमच्या साथीने तो नगराध्यक्ष म्हणून निवडून येईल आणि लोकांचे प्रश्न सोडवेल, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.
