राज्यसभा निवडणुकीनंतर अजित पवारांनी बारामतीमध्ये जन सन्मान मेळावा घेत जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. या मेळाव्याच्या निमित्तानं अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं शहरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केली होती. तसंच मेळाव्याच्या ठिकाणीही होर्डिंग लावण्यात आले होते. पण त्या होर्डिंग आणि बॅनरचं वैशिष्ट्य म्हणजे त्यावर गुलाबी रंगाचा वापर करण्यात आला होता. एवढचं काय पण त्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवारही गुलाबी जॅकेटमध्ये दिसले.
advertisement
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या पक्षानं तयारी सुरु केली आहे. त्यासाठी डिझाईन बॉक्स्ड नावाच्या कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नरेश आरोरा यांची design boxed.com नावाची कंपनी आहे. राजकीय पक्षाचं ब्रॅण्डिंग, निवडणूक रणनीती आणि प्रचार व्यवस्थापनाचं काम या कंपनीकडून केलं जातं. या कंपनीनं यापूर्वी काँग्रेससाठी निवडणुकीत काम केलं आहे.
राजस्थान आणि कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचं ब्रॅण्डिंग डिझाईन बॉक्स्ड डॉट कॉमनं केलं होतं. आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीची धुरा या कंपनीवर सोपवण्यात आली आहे. अजित पवारांच्या गुलाबी रंगाच्या जॅकेटमागे या कंपनीची स्ट्रॅटर्जी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. डिझाईन बॉक्स्ड डॉट कॉमकडून अजित पवार आणि त्यांच्या पक्षाचं ब्रँण्डिंग केलं जाणार आहे. त्यासठी या कंपनीला 200 कोटी रुपये दिले असल्याचा दावाही रोहित पवारांनी केला होता.
अजित पवारांनी नुकतेच मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात जावून पूजा केला होती. त्यामागे डिझाईन बॉक्स्ड कंपनीची रणनीती असल्याचं बोललं जातं. आगामी विधानसभा निवडणूक प्रचारात अजित पवारांच्या पक्षाचे बॅनर, होर्डिंग आणि जाहिरातीवर गुलाबी रंग दिसणार आहे. पण गुलाबी रंग विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या पक्षाला यश मिळवून देणार का? हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईल.