नेमकं प्रकरण काय?
अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील रहिवासी असणाऱ्या एका महिला पोलिसानं नुकतंच बाळापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. आपला पती समलिंगी आहे, त्याने आपल्यापासून ही बाब लपवली. तसेच सासरच्या मंडळींकडून आपल्याला जाच केला जात आहे, अशी तक्रार महिला पोलिसानं केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सासरच्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
advertisement
पीडित महिला पोलिसाचा अडीच वर्षांपासून बार्शी टाकळी तालुक्यातील एका गावातल्या युवकासोबत लग्न झालं होतं. लग्नाला काही दिवस उलटले नाहीत, तोपर्यंत आरोपींनी महिलेला जाच करायला सुरुवात केली. सासरच्यांनी घर दुरुस्तीसाठी १ लाख आणि शेतीवरील कर्ज फेडण्यासाठी दोन लाख घेतले, अजूनही पाच लाखांची मागणी करत असल्याचं महिलेनं तक्रारीत म्हटलं आहे. एवढंच नव्हे तर आपला पती समलिंगी असल्याचा दावाही तिने केला.
खरं तर, लग्नानंतर सासरी जाच होत असल्याने पीडित महिला आपल्या पतीसह अकोला शहरातील पोलीस वसाहतीत वास्तव्याला होता. घटनेच्या दिवशी तिच्या पतीने मोबाइल चार्जिंगला लावला होता. यावेळी महिलेनं आपल्या पतीचा मोबाईल चेक केला. व्हॉट्सअॅपवरील पतीचे मेसेज बघून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याचे त्याच्या मित्रांसोबत आक्षेपार्ह संभाषण आढळून आले. याबाबत महिलेनं जाब विचारला असता आपण समलिंगी असल्याचा आणि इतर पुरुषांसोबत संबंध असल्याचं पतीनं कबुल केलं. ही बाब समजल्यानंतर महिलेनं बाळापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पतीनं केवळ पैशांसाठी आपल्याशी लग्न केलं, याची कबुली स्वत: पतीनं दिल्याचंही महिलेनं तक्रारीत सांगितलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी पतीसह सासरच्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास केला जात आहे.