अकोले तालुक्यातील देवठाण गावामध्ये वस्ती परिसरामध्ये तीन वर्षीय मुलीवर बिबट्याने हल्ला केला आहे. या दुर्देवी घटनेमध्ये कविता गांगड हिचा मृत्यू झाला आहे. काल (मंगळवार- 14 ऑक्टोबर) सायंकाळी घराच्या अंगणात खेळत असताना बिबट्याने या तीन वर्षीय मुलीवर हल्ला केला. बिबट्याने हल्ला करून तिचा मृतदेह ऊसाच्या शेतात सुमारे 300 मीटर अंतरावर नेला. घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून गावकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे. बिबट्याच्या वारंवार होणार्या हल्ल्याच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
advertisement
अकोले तालुक्यातील देवठाण गावातील तीन वर्षीय कविता गांगड ही मुलगी घराच्या समोर संध्याकाळच्या वेळी खेळत होती. घराच्या समोर असलेल्या अंगणामध्ये खेळत असतानाच बिबट्याने तिच्यावर हल्ला केला. घराच्या समोर असलेल्या ऊसामध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याने कवितावर झडप टाकून ऊसात शिरला. कविताचा मृतदेह बिबट्याने ऊसाच्या शेतात सुमारे ३०० मीटर अंतरापर्यंत नेला. दरम्यान, तात्काळ गावकऱ्यांनी त्याच दिशेने धाव घेतली असता तिचा मृतदेह ताब्यात घेतला. घटनेची माहिती गावकऱ्यांनी पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी कविताचा मृतदेह ग्रामीण रुग्णालय कोतुळ येथे शवविच्छेदनासाठी पाठवला. वनविभागाने नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.