शेवटची भेट आणि भीषण अपघात
सोमवारी सकाळी सपनाला पुण्यात कामावर रुजू व्हायचं होतं. रात्री १२:१० ची बस पकडण्यासाठी वडील गजाननराव स्वतःच्या दुचाकीने सपना आणि दुसरी मुलगी प्रियंका यांना घेऊन एमआयडीसीच्या दिशेने निघाले. लेकीला सोडण्यासाठी बाप निघाला, एकीकडे मनात काळजी आणि चिंता होती. दुसरीकडे लेक नोकरीला लागली याचा आनंद होता. लेकीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी निघाले आणि एमआयडीसी क्रॉसिंगवर रस्ता ओलांडताना, अमरावतीकडून बडनेराकडे येणाऱ्या एका आलिशान XUV ने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. कारचा स्पीड ताशी ११० ते १२० होता.
advertisement
ही धडक इतकी भयंकर होती की 40 फुटापर्यंत मुली आणि वडील लांब उडाले. कारचं मोठं नुकसान झालं. वडिलांचा जागीच मृत्यू झाला. तर उपचारादरम्यान मुलीनं प्राण सोडले. एक मुलगी जखमी आहे. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. धडक बसताच गजाननराव यांचा पाय शरीरापासून वेगळा झाला आणि ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. सपना आणि प्रियंकाही लांब फेकल्या गेल्या. कारच्या दोन्ही एअरबॅग्ज उघडल्या. ज्या सपनाला पुण्याला जायचं होतं, तिचा आणि तिच्या पाठीशी खंबीर उभ्या राहणाऱ्या पित्याचा मृत्यू झाला.
एकाचवेळी दोन अंत्ययात्रा; गाव गहिवरलं
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. कार चालक मद्यधुंद अवस्थेत होता आणि त्याचा वेगही जास्त होता त्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे सपनाच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला. सोमवारी दुपारी मायानगर परिसरातील माकोडे यांच्या घरातून एकाच वेळी वडील आणि मुलीची अंत्ययात्रा निघाली, तेव्हा उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे डोळे पाणावले.
ज्या लेकीच्या लग्नाच्या अक्षता पडायच्या होत्या, तिच्यावर वडिलांसोबतच अंत्यसंस्कार करण्याची वेळ कुटुंबावर आली. या भीषण अपघातात दुसरी मुलगी प्रियंका गंभीर जखमी असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धडक दिल्यानंतर मनीष शोभाणी हा कारचालक घटनास्थळावरून पसार झाला. मात्र काहीवेळानंतर तो स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाला. पाहुण्यांना आणण्यासाठी रेल्वे स्टेशनवर जाताना अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.
