अभिजीत पोते, प्रतिनिधी, पुणे: मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मनोज जरांगेंच्या नेतृत्वात आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू झाले आहे. जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून हजारो लोक मुंबईत दाखल झाले आहेत. आज मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. मनोज जरांगे यांनी रविवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आता मनसे नेते अमित ठाकरे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
advertisement
मनसे नेत अमित ठाकरे हे पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या वेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा आंदोलनावर भाष्य केले. त्यांनी म्हटले की, जे मराठा बांधव आहेत, ते एक दोन दिवसाची तयारी करून आले होते. त्यांचे सगळे साहित्य संपलं आहे. त्यांना एकटे नको वाटायला ही भावना आहे म्हणून मदतीचा आवाहन केले असल्याचे त्यांनी म्हटले.
राज यांच्यावर जरांगेंची टीका...
रविवारी, मनोज जरांगे पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका करताना कुचक्या कानाचा आणि मानासाठी भूकेला असल्याची टीका केली होती. राज ठाकरे यांचा पक्ष फडणवीसांनी संपवला, मुलाला निवडणुकीत पाडलं असलं तरी त्यांना फडणवीस चहा प्यायला येतात, याचं कौतुक वाटतं असल्याचे मनोज जरांगे यांनी म्हटले होते. जरांगे यांनी राज ठाकरे यांना लक्ष्य केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते.
अमित ठाकरेंनी काय म्हटले?
राज ठाकरे यांचे पुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी म्हटले की, आम्ही आमची भूमिका बदलली नाही. जरांगे गेल्या वेळेस पनवेलपर्यंत आले होते. त्यावेळी ते पुन्हा माघारी का गेले होते, त्यावेळी त्यांना काय आश्वासन देण्यात आलं होतं आणि आता परत का आले? असा प्रश्न अमित यांनी उपस्थित केला. जरांगे यांना ज्यांनी आश्वासन दिलं होतं त्यांना त्याबाबत विचारायला नको का?तुम्ही कोणाला मूर्ख बनवत आहात, आमची भूमिका अजूनही स्पष्ट असल्याचे अमित ठाकरे यांनी म्हटले. मुंबईत मराठा बांधव आले आहेत, त्याच्यापर्यंत अन्न पाणी पोहचले पाहिजेत अशीही आमची भूमिका असल्याचे त्यांनी म्हटले. सरकारने याकडे लक्ष द्यायला हवं, आंदोलनात काही तर मार्ग काढायला हवा, लोक त्यांच्या मागण्या घेऊन आले आहेत यावर लवकरात लवकर तोडगा निघावा अशी मागणीदेखील त्यांनी केली.
राज यांनी काय म्हटले?
राज ठाकरे यांना मराठा आंदोलनावर विचारलेल्या प्रश्नावर जरांगे हे मुंबईत का आले, याचे उत्तर एकनाथ शिंदे देतील असे म्हटले. शिंदे यांनी जरांगेंना वाशीत काय आश्वासन दिले होते आणि आता परत ते का आले, हे शिंदेच सांगू शकतील असे उत्तर दिले होते. त्यावर मनोज जरांगे यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिले.