अमरावती महापालिकेत भाजपने २५ जागांवर विजय मिळवला आहे. त्यापाठोपाठ बडनेराचे आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाला १५ जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ११ आणि शिवसेना (शिंदे गट) ३ जागांवर विजयी झाला आहे. ८७ सदस्यसंख्या असलेल्या अमरावतीत बहुमताचा आकडा ४४ आहे. भाजपला इथं सत्ता स्थापन करण्यासाठी १९ नगरसेवकांची आवश्यकता आहे. पण रवी राणा आणि संजय खोडके यांच्यातील वादाचा भाजपला फटका बसत आहे.
advertisement
आमदार रवी राणा यांनी 'युवा स्वाभिमान'च्या मदतीने भाजपचा महापौर होईल, अशी घोषणा केली असली तरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार संजय खोडके यांनी खोडा घातला आहे. "भाजप जर रवी राणांची मदत घेणार असेल, तर आम्ही सत्तेत सहभागी होणार नाही," अशी स्पष्ट भूमिका खोडके यांनी घेतली आहे. दुसरीकडे, शिवसेना शिंदे गटाने अजून आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे.
अमरावतीत १५ जागा मिळवून रवी राणा सध्या 'किंगमेकर'च्या भूमिकेत आहेत. भाजपला पाठिंबा देताना ते 'स्थायी समिती सभापती' पदाची मागणी करण्याची शक्यता आहे. महापालिकेत तिजोरीच्या चाव्या राणांकडे गेल्या तर आपल्याला काय मिळणार? यावरून अजित पवार गट सत्तेत जाण्यास इच्छुक नाही. तसेच राणांकडे तिजोरीच्या चाव्या देण्यास भाजप कितपत इच्छुक असेल? हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे. अजित पवार गट आणि युवा स्वाभीमानी पक्ष एकत्र आले नाहीत, तर भाजपचं महापौरपद अडचणीत येऊ शकतं. मुंबईत शिवसेना शिंदे गट किंगमेकरच्या भूमिकेत आहे. तिथं तिसऱ्या क्रमांकाची सेनेला मिळाली आहेत. मुंबईत सत्ता स्थापनेसाठी शिंदेंची आवश्यकता आहे. मात्र तिथे शिंदेंनी भाजपची कोंडी करत महापौर पदासाठी फिल्डिंग लावली आहे. असाच काहीसा प्रयोग अमरावतीत देखील बघायला मिळत आहे.
अमरावतीत महायुतीचा विजय झाला असला तरी येथील स्थानिक भाजप नेते नवनीत राणांवर नाराज आहेत. त्यांनी नवनीत राणांच्या हकालपट्टीची मागणी केलीय. आमचा पराभव जनतेनं नव्हे तर नवनीत राणांनी केलाय, असा आरोप भाजपच्या स्थानिक नेत्यांनी केला आहे.
नवनीत राणा यांनी स्वतःला 'स्टार प्रचारक' दर्शवून भाजप उमेदवारांना योजनापूर्वक पाडण्याचे काम केलं, असा आरोप देखील भाजप नेत्यांनी केला आहे.
