पोलिस जमादार पदावरून सेवानिवृत्त
राजेश शंकरराव पाटील असे आत्महत्या केलेल्या निवृत्त जमादाराचे नाव आहे. राजेश पाटील हे 2022 मध्ये अमरावती शहरातील फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यातून जमादार पदावरून सेवानिवृत्त झाले होते. निवृत्तीनंतर ते अमरावतीतच वास्तव्यास होते.
घरात कोणीही नसताना उचललं टोकाचं पाऊल
मंगळवारी दुपारी, घरात कोणीही नसताना, राजेश पाटील यांनी दोरीने गळफास घेऊन आपले जीवन संपवलं. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. माहिती मिळताच राजापेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. यावेळी त्यांना राजेश पाटील यांनी लिहिलेली एक चिठ्ठी आढळून आली.
advertisement
20 किलो वजन उतरलं
या चिठ्ठीमध्ये राजेश पाटील यांनी आपल्या आत्महत्येमागील कारण स्पष्ट केले आहे. त्यांना मागील काही वर्षांपासून मधुमेहाचा (Diabetes) आजार होता, शिवाय किडनीचाही त्रास जडला होता. या गंभीर आणि दीर्घकाळ चाललेल्या आजारपणामुळे त्यांच्या शरीरावर मोठा परिणाम झाला होता. जवळपास 20 किलो वजन या आजारामुळे कमी झाले होते. आजारामुळे आपलं जगणं असह्य झालं आहे आणि त्यामुळेच आपण हा निर्णय घेत आहोत, असे त्यांनी त्या चिठ्ठीत नमूद केले होते.
माहितीला दुजोरा
राजापेठचे ठाणेदार पुनीत कुलट यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. घटनास्थळावर मिळालेल्या चिठ्ठीवरून राजेश पाटील यांनी आजारपणाला कंटाळूनच आत्महत्या केल्याचे स्पष्ट होत असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. एका निवृत्त पोलिस कर्मचाऱ्याने आजारपणाला कंटाळून असे टोकाचे पाऊल उचलल्याने हळहळ व्यक्त होत आहे.