शेवट हृदयद्रावक शोकांतिकेत
अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील पुसला गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे, ज्यामुळे संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे. ज्या घरात काही वेळापूर्वी सनईचा आवाज गुंजत होता, तिथे काही क्षणातच अत्यंत शांतता आणि निशब्दता पसरली. एका लग्नसोहळ्याचा शेवट अत्यंत हृदयद्रावक शोकांतिकेत झाला आहे. अमोल गोड नावाच्या नवरदेवाच्या मृत्यूने एकच खळबळ उडाली होती.
advertisement
चक्कर आली आणि मंडपात कोसळले
कोतवाल म्हणून शासकीय सेवेत असलेले अमोल गोड यांचा विवाह पुसला येथे नुकताच मोठ्या उत्साहाने संपन्न झाला. वधू-वर एकमेकांना हार घालून लग्नाचे विधी पार पडले आणि वधू-वरांना उपस्थितांकडून शुभेच्छा मिळत होत्या. याच आनंदी वातावरणात नवरदेव अमोल गोड यांना अचानक चक्कर आली आणि ते मंडपात कोसळले. लग्नानंतर अवघ्या अर्ध्या तासात हा प्रकार घडल्याने सर्वत्र मोठी खळबळ माजली.
हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
अमोल गोड यांना तत्काळ रुग्णालयात नेण्यासाठी पाहुण्यांनी मोठी धावपळ केली. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. अमोल गोड यांचा मृत्यू तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे समोर आले आहे. ज्या वधूच्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद क्षणार्धात हिरावला गेला, तिच्यासह वर आणि वधूच्या दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एका कर्तृत्ववान तरुणाचा झालेला हा दुर्दैवी अंत संपूर्ण परिसराला चटका लावून गेला आहे.
