नेमकं काय घडलं?
नेहमीप्रमाणे सकाळी प्रियंका घराबाहेर पडली मात्र बराच वेळ उलटून गेल्यावरही मुलगी घरी न परतल्याने तिचे वडील राजेश निंबाळकर (वय 52, रा. बोराळा) यांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. दुपारी 2 च्या सुमारास गावातील तलावात महिलेचा मृतदेह असल्याची माहिती मिळताच त्यांनी धावत जाऊन पाहणी केली. मृतदेह हा त्यांच्या मुलीचाच असल्याचे लक्षात येताच ते कोसळूनच पडले.
advertisement
प्रेमविवाह अन् वर्षभरातच तणाव…
प्रियंका आणि सचिन उर्फ प्रशांत शिवलाल श्रीवास (वय 30, रा. अजितपूर) यांचा 2022 मध्ये प्रेमविवाह झाला होता. सुरुवातीच्या काही महिन्यांनंतर दोघांमध्ये वाद वाढत गेले. फक्त एका वर्षाच्या आतच सचिनने प्रियंकाला माहेरी आणून सोडले. यानंतर लगेचच दोघांचा घटस्फोटही झाला.
घटस्फोटानंतरही त्रास कायम
विवाहबंध लयाला गेल्यानंतरही सचिनचा प्रियंकावरचा मानसिक छळ कमी झाला नाही. तो सतत फोन करून किंवा प्रत्यक्ष भेटून तिला खालच्या शब्दांत बोलून त्रास देत होता, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. या सततच्या त्रासामुळे प्रियंका मानसिकदृष्ट्या खूपच अस्थिर झाली होती.
तू अजून जिवंत कशी आहेस?
30 नोव्हेंबर रोजी सचिनने पुन्हा तिच्याशी संपर्क साधत, मी तुला फारकत देऊन फसवले… तू अजून जिवंत कशी आहेस? तू मरत का नाहीस? असे अशा शब्दांत सुनावले. या वक्तव्याने ती तणावाखाली गेली, भयभीत झाली आणि पूर्णपणे खचली. या मानसिक तणावातून मार्ग काढू न शकल्याने 2 डिसेंबर रोजी सकाळी प्रियंकाने बोराळा येथील तलावात उडी घेत स्वतःचे जीवन संपविले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
खल्लार पोलिसांत गुन्हा दाखल
या प्रकरणी प्रियंकाचे वडील राजेश निंबाळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खल्लार पोलिसांनी रात्री 11 वाजता सचिन उर्फ प्रशांत शिवलाल श्रीवास याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कलम 306 अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.






