दोन महिन्यांपूर्वी केले होते दुसरे लग्न
45 वर्षीय नीलिमाचे दोन महिन्यांपूर्वी सनी उर्फ नितीन इंगोले याच्याशी लग्न झाले होते. पहिल्या लग्नातील पती आणि मुलाच्या मृत्यूनंतर नीलिमा एकटी राहत होती. नवीन लग्नानंतर सनीवर सतत त्याच्या घरी घेऊन जाण्यासाठी तिने दबाव टाकण्यास सुरुवात केली होती. सनी भूजल सर्वेक्षणच्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागात कार्यरत होता. सरकारी कर्मचारी असल्याने हे लग्न कायद्याने धोक्याचे ठरू शकते, हे नीलिमाला माहीत होते. याचा फायदा घेत नीलिमा त्याच्यावर तक्रारींचा तसेच ब्लॅकमेलिंगचा पगडा ठेवत होती. याच कारणामुळे तिने गाडगेनगर ठाण्यात त्याच्याविरोधात तक्रारही केली होती. त्यामुळे वैवाहिक नात्यात आणखी तणाव वाढला.
advertisement
उखळाचा दगड आणि चाकूने केली हत्या
दरम्यान, नीलिमाच्या वाढत्या दबावामुळे त्रस्त झालेल्या सनीने तिच्या हत्येचा कट रचला. 30 नोव्हेंबरच्या रात्री, घरकाम करणारी महिला गेल्यानंतर तो दारूच्या बाटल्या घेऊन नीलिमाच्या घरी पोहोचला. काही वेळ दोघांनी मद्यपान केले आणि नीलिमा झोपल्यावर सनीने तिच्यावर उखळाचा दगड आपटत हल्ला केला. ती किंचाळताच त्याने चाकू घेऊन तिच्या मानेवर वार केले आणि तिचा जागीच मृत्यू झाला. गुन्हा करून तो मागच्या दाराने घराबाहेर पडला.
पुरावे नाल्यात फेकले
हत्येनंतर पुरावे नष्ट करण्यासाठी सनीने उखळ, दारूचे ग्लास, जेवणाची प्लेट, नीलिमाचा मोबाइल आणि सीसीटीव्हीचा डीव्हीआर या सर्व वस्तू गोळा करून बाजार रोडवरील नाल्यात आणि इतवारा परिसरात फेकून दिल्या. दरम्यान पोलिसांना सुरुवातीपासूनच त्याच्यावर संशय होता. त्याचे मोबाइल लोकेशन दोन दिवस एकाच ठिकाणी असल्याचे दिसून आल्याने आणि खुनाच्या वेळीदेखील त्याचा फोन नीलिमाच्या घराच्या परिसरात असल्याचे समोर आल्यानंतर तपास अधिक वेगाने पुढे गेला. डीव्हीआर आणि इतर तांत्रिक पुरावेही मिळत गेले.
आरोपीला अटक
शेवटी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या पथकाने सनीला अटक केली. पुढील कारवाईसाठी त्याला राजापेठ पोलिसांच्या ताब्यात दिले. हत्या, ब्लॅकमेलिंग आणि वैवाहिक तणावाची ही संपूर्ण मालिका समोर येताच परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.






