राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील कार्याबाबत माहिती मोझरी येथील गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष अरविंद राठोड यांनी दिली आहे. ते सांगतात की, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्म यावली या गावी 30 एप्रिल 1909 साली झाला. महाराजांनी 1935 ला श्री गुरुदेव धर्म सेवाश्रमची स्थापना केली. त्यानंतर अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ या नावाने ते नावारूपाला आलं. त्या माध्यमातून त्यांनी समाजकार्य सुरू केले. अंधश्रद्धा निर्मूलन, बलिदान पद्धती, राष्ट्रभक्ती यासाठी त्यांनी काम केले. समाजाला आवश्यक असणाऱ्या सर्वच बाबी पुढे आणण्याचे कार्य राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केले.
advertisement
Independence: महात्मा गांधींनी इथंच दिला ‘भारत छोडो’चा नारा, मुंबईतलं ऐतिहासिक मैदान माहितीये का?
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी 1936 ला सालबर्डी येथे 'ना भूतो न भविष्यते' असं यज्ञ करून दाखवलं. भारत हा अध्यात्मिक भूमीचा देश आहे. त्यामुळे या माध्यमातून लोकांना एकत्रित करण्याचा त्यांचा मानस होता. 1930 मध्ये त्यांनी गांधीजींच्या सत्याग्रहात प्रत्यक्ष सहभाग घेतला. तसेच 1942 च्या "भारत छोडो" आंदोलनातही ते सहभागी झाले. नागपूर व रायपूर तुरुंगात कैदवासही त्यांनी भोगला. तसेच भजनांच्या माध्यमातून त्यांनी जनतेला जागृत केले, असे त्यांनी सांगितले.
जनजागृतीसाठी त्यांचा भजनांचा वापर
झुठी गुलाम शाही क्या डर बता रहा है,
जुल्मो का ख्याफ देकर किसको डरा रहा है
आजादी हमारा हक है, लेकर रहेंगे अब हम...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी गावोगावी भजन मंडळीद्वारे स्वातंत्र्याचा संदेश पोहोचवला. भजनांतून ब्रिटिश सरकारच्या अन्यायाविरुद्ध लोकांना एकत्र केले.
“विजयी हो, विजयी हो, भारत देश हमारा”
“झाडझडुले शस्त्र बनतील, भक्त बनतील सेना”
“देश हा देव, देश हा धर्म”
“तिरंगा वंदन करू या, भारतमातेचे गाऊ गाणे”
“जाग उठो बालबीरों तुम, अब तुम्हारी बारी है”
“तन मन धन से सदा सुखी हो, भारत देश हमारा”
“चेत रहा है भारत दुख से, आग बुझाना मुश्किल है”
अशा प्रकारच्या अनेक भजनातून त्यांनी समाजप्रबोधन केले.
त्याचबरोबर तुकडोजी महाराजांनी ‘ग्रामगीता’ या ग्रंथातून ग्रामीण भारताच्या विकासाची दिशा दाखवली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुंदर गावाची संकल्पना त्यांनी राबविली. ग्रामगीतेच्या माध्यमातून राष्ट्रनिर्मिती, आत्मनिर्भरता, स्वच्छता, शिक्षण, आणि समाजातील ऐक्य या सर्व बाबींचा संदेश त्यांनी दिला, अशी माहिती अरविंद राठोड यांनी दिली.