Independence: महात्मा गांधींनी इथंच दिला ‘भारत छोडो’चा नारा, मुंबईतलं ऐतिहासिक मैदान माहितीये का?
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Independence: मुंबई शहर हे स्वातंत्र्य संग्रामातील अनेक ऐतिहासिक घटनांचे केंद्र राहिले. याच शहरातील ऑगस्ट क्रांती मैदानाबाबत जाणून घेऊ.
मुंबई : 15 ऑगस्ट 2025 रोजी भारत आपला 79 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. 1947 मध्ये मिळालेल्या स्वातंत्र्यासाठी देशभरातील अनेकांनी योगदान दिलं. त्यात मुंबई आणि मुंबईकरांची भूमिका महत्त्वाची राहिली. या शहराने स्वातंत्र्य संग्रामातील अनेक ऐतिहासिक क्षण अनुभवले असून, येथे असलेल्या काही ठिकाणांनी स्वातंत्र्य संग्रामाच्या खुणा आजही जपल्या आहेत. मुंबईत अशी अनेक स्थळे आहेत जी देशाच्या स्वातंत्र्य इतिहासाची जिवंत साक्ष देतात. याबाबत लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
स्वातंत्र्य संग्रामातील अनेक ऐतिहासिक घटनांचे केंद्र राहिलेल्या मुंबईतील सर्वात महत्त्वाचे ठिकाण म्हणजे ऑगस्ट क्रांती मैदान. या मैदानाने 1942 च्या भारत छोडो आंदोलनाला जन्म देत भारतीय इतिहासातील एक निर्णायक क्षण घडवला. त्यामुळे हे मैदान भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील एक ऐतिहासिक साक्षीदार आहे. ब्रिटिश राजवटीच्या काळात या मैदानाला गोवालिया टँक मैदान असे म्हणत, कारण येथे पिण्याच्या पाण्यासाठी एक मोठा टँक (जलाशय) होता. कालांतराने हा भाग सार्वजनिक कार्यक्रम, सभा आणि राजकीय चळवळींसाठी वापरला जाऊ लागला.
advertisement
8 ऑगस्ट 1942 रोजी येथे ऑल इंडिया काँग्रेस कमिटीची बैठक झाली होती. महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद यांसारखे सर्व अग्रगण्य नेते उपस्थितीत होते. गांधीजींनी ‘करेंगे या मरेंगे’ असा नारा देत ब्रिटिशांना भारत सोडण्याची ठाम मागणी केली. हीच घोषणा ‘भारत छोडो आंदोलन’ या नावाने इतिहासात अमर झाली.
advertisement
गांधीजींच्या घोषणेनंतर दुसऱ्याच दिवशी ब्रिटिशांनी सर्व प्रमुख नेत्यांना अटक केली. मात्र या अटकांनी जनतेची जिद्द कमी झाली नाही. देशभरात रेल्वे रुळ उखडणे, टेलिग्राफ लाइन तोडणे, सरकारी कार्यालयांवर ताबा घेणे अशा कृतींमुळे ब्रिटिश प्रशासन हादरले. या चळवळीने स्वातंत्र्य लढ्याला निर्णायक गती मिळवून दिली.
स्वातंत्र्यानंतर या मैदानाला ‘ऑगस्ट क्रांती मैदान’ हे नाव देण्यात आले आणि येथे ऐतिहासिक दिवसाची आठवण जपण्यासाठी स्मारक स्तंभ उभारण्यात आला. दरवर्षी 8 ऑगस्ट रोजी येथे कार्यक्रम आयोजित केले जातात. स्वातंत्र्यसैनिक, इतिहासकार, विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित राहून स्वातंत्र्य संग्रामातील या महत्त्वपूर्ण क्षणाची आठवण ताजी करतात.
advertisement
स्वातंत्र्यानंतरही हे मैदान लोकशाही चळवळींचे केंद्र राहिले आहे. महाराष्ट्राच्या निर्मितीच्या आंदोलनापासून ते विविध सामाजिक आणि राजकीय चळवळींपर्यंत अनेक महत्त्वाच्या सभा आणि निदर्शनांची ही जागा साक्षीदार ठरली आहे. आज मैदानाभोवती नागरी विकास झाला असला तरी, त्याची ऐतिहासिक ओळख आणि 1942 च्या जाज्वल्य क्रांतीची आठवण कायम आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Aug 14, 2025 1:53 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Independence: महात्मा गांधींनी इथंच दिला ‘भारत छोडो’चा नारा, मुंबईतलं ऐतिहासिक मैदान माहितीये का?








