अमरावती : अमरावतीमध्ये सोयाबीन, कापूस, तूर हे पिकं जास्त घेतली जातात. जास्तीत जास्त क्षेत्र हे कपाशीचे असते. या वर्षी सुद्धा अनेक शेतकऱ्यांनी कपाशीचे पीक घेतले आहे. काही लोकांचे कापूस पीक घरी आणायला सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांनी कर्ज काढून शेतीला लागत लावली असल्याने त्यांना शेतातील कोणत्याही मालाला योग्य भाव मिळेल अशी अपेक्षा असते. पण, नेहमी त्यांचा अपेक्षा भंग होतो. यावर्षी सुद्धा कापूस पिकाच्या बाबतीत तसेच चित्र दिसून येत आहे. त्यामुळे अमरावतीमधील शेतकरी संतापले आहेत.
advertisement
कापूस उत्पादक शेतकऱ्याला यावर्षी पेरणी केली तेव्हा पासूनच नुकसान सहन करावे लागत आहे. आधी पावसाने नुकसान केलं. त्यानंतर विविध रोगांचा प्रादुर्भाव आणि आता कापसाला भाव नाही. केंद्राकडून जाहीर झालेला हमीभाव हा 7000 च्यावर आहे. चालू हंगामात मध्यम धाग्याच्या कापसासाठी 7121 रुपये तर लांब धाग्याच्या कापसासाठी 7521 रुपये इतका हमी भाव जाहीर केलाय. खासगी व्यापारी 6500 ते 6900 असा भाव शेतकऱ्यांना देत आहे.
कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर संकट, बोंड अळीचा धोका वाढला, कशी घ्यावी काळजी?
अमरावतीमधील शेतकऱ्यांशी लोकल 18 ने चर्चा केली तेव्हा शेतकरी वैभव साबळे सांगतात की, 'या वर्षी सुरुवातीपासूनच शेतीला ग्रहण लागले आहे. कपाशी पिकांवर बोंड अळी, लाल्या या प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव झालाय. त्यामुळे आधीच उत्पादनात घट होतांना दिसून येत आहे. आधी जिथे 10 क्विंटल कापूस उत्पादन होते तिथे आता फक्त 7 क्विंटलवर आलेलं आहे. लागत खर्च खूप वाढला आहे. जे खताची बॅग आधी 800 रुपयाला होती ती आता 1400 रुपयांची झाली आहे.
इतरही खर्च अशाच प्रमाणात वाढला आहे. मग, शेतीला लागणाऱ्या साहित्याच्या किंमतीत वाढ आणि शेतमालाला भाव नाही. यामुळे शेती परवडेल असं वाटत नाही. शेतकऱ्याच्या मालाला भाव दिला तर लाडकी बहीण योजनेची गरज नाही, कर्ज माफीची गरज नाही. शेतकऱ्याच्या मालाला 10 ते 12 हजार रुपये प्रति क्विंटल भाव द्या, सर्व समस्यांचे निराकरण आपोआप होईल,' असे ते म्हणाले.
शेतकरी सुखदेवराव बोपची सांगतात की, 'कापूस शेती धोक्यात आहे. इतर शेतीला लागत कमी असू शकते पण कापूस शेती ही कमी खर्चात होत नाही. त्यामुळे कापसाला 10 हजार रुपयांपर्यंत भाव दिला पाहिजे तेव्हाच शेतकरी सुखी होईल.'
तरुण शेतकरी म्हणतात की, 'आमच्या हाताला नोकरी नाही. मग इकडून तिकडून बापाच्या खांद्याला खांदा लावून शेती करावी तर तुम्हाला आता स्थिती माहीतच आहे. खत, बियाणे याच्या किमती गगनाला भिडल्यात पण शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही. पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढत आहे, सोयाबीनच्या किंमती कमी होत आहे. शेतकऱ्यांनी पुढे काय करावं? हा प्रश्न सद्या आमच्या पुढे आहे.'