विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विधान परिषदेत नगराध्यक्षपदाच्या विधेयकावर शिवसेना नेते आमदार अनिल परब बोलत असताना त्यांनी महिला सुरक्षेचा विषय काढून मंत्री भरत गोगावले यांच्यावर उपरोधिक टीका करताना जोरदार फटकेबाजी केली. त्यांच्या फटकेबाजीने सत्ताधारी आणि विरोधी बाकांवर बसलेले सदस्य हास्य सागरात बुडाले होते.
अनिल परब यांनी अदिती तटकरेंसाठी लिंबू मिरची सभागृहात आणली!
advertisement
नगराध्यक्षपदाच्या विधेयकावर बोलताना शिवसेना ठाकरे पक्षाचे अनिल परब यांनी लाडक्या बहिणीच्या सुरक्षेसाठी आपले योगदान देण्याची इच्छा व्यक्त केली. सरकारने लाडक्या बहिणींसाठी प्रतिमाह १५०० रुपये देण्याची योजना सुरू केली आहे. परंतु लाडक्या बहिणीसाठी माझे योगदान काय, असा मला प्रश्न पडला आहे. रायगडमध्ये पालकमंत्रिपदासाठी रेडे, बैल कापले जात असल्याचे समाज माध्यमांतून वाचण्यात आले. मी अंधश्रद्धा मानत नाही पण माझ्या बहिणीच्या सुरक्षेची मला काळजी वाटते. एका पालकमंत्रिपदासाठी रायगडमध्ये अघोरी प्रकार सुरू असल्याने मी आदिती तटकरेंच्या सुरक्षेसाठी लिंबू मिरची आणली आहे, असे अनिल परब म्हणाले.
तुम्ही अंद्धश्रद्धा पसरवताय... असे काही सदस्य अनिल परब यांना म्हणाले. त्यावर मी वैयक्तिकरित्या अंद्धश्रद्धा मानत नाही. पण आपल्या संस्कृतीत भावाने बहिणीसाठी काहीतरी करायचे असते. तिचे रक्षण करायचे असते. मला बाकी काही देणे जमणार नाही. म्हणून मी आदितीताईच्या रक्षणासाठी लिंबू मिरची आणली आहे, असे अनिल परब म्हणाले. ही सगळी फटकेबाजी करताना त्यांनी एकदाही मंत्री भरत गोगावले यांचे नाव घेतले नाही.
पालकमंत्रिपद मिळविण्यासाठी गोगावले यांनी अघोरी पूजा केल्याचा आरोप झाला. जादूटोणा करणाऱ्या साधू महाराजांना घरी बोलावून त्यांनी पूजा करवून घेतली, अशा चित्रफिती समाज माध्यमांवर प्रसारित झाल्या होत्या. हाच धागा पकडून अनिल परब यांनी फटकेबाजी केली.