विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराने जोर पकडला आहे. त्यातच संभाजीनगरचे राजकीय वातावरण गरम होऊ लागले आहे. आज संभाजीनगरमध्ये असदुद्दीन ओवेसी यांनी पदयात्रा काढत आपल्या उमेदवारांचा प्रचार केला. एमआयएमचे दोन्ही आमदार संभाजीनगरात निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बटेंगे तो कटेंगे, एक रहे तो साथ रहेंगे या वक्तव्यावर ओवेसी यांना विचारले असता त्यांनी मोदींच्या १० वर्षांच्या राजवटीवर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या १० वर्षांपासून देशाचे प्रमुख म्हणून काम पाहत आहेत. १० वर्ष देशाचे प्रमुख म्हणून काम केल्यानंतरही हिंदू सुरक्षित नाहीत का? अशा शब्दात त्यांनी भाजपच्या नाऱ्याचा समाचार घेतला.
advertisement
हिंदू मतांचे ध्रुवीकरण, योगी आदित्यनाथांकडे जबाबदारी
लोकसभा निवडणुकांत मुस्लिम समाजाने मतांचे भरभरून दान महाविकास आघाडीच्या पारड्यात टाकले. त्यामुळे अनेक मतदारसंघात महायुतीला फटका बसला. अगदी महायुतीची ४२ जागांची गाडी १५ जागांवर आली. राज्यातल्या अनेक मतदारसंघात मुस्लिम मतांमुळे आघाडीचे उमेदवार जिंकल्याचे मतमोजणीनंतर स्पष्ट झाले. तेव्हापासून व्होट जिहाद झाला, असा प्रचार महायुती विशेषत: भारतीय जनता पक्ष करीत आहे. तेव्हापासून हिंदू मतांचे ध्रुर्वीकरण करण्याचा भाजपचा अजेंडा आहे. हीच जबाबदारी विधानसभा निवडणुकांत प्रखर हिंदुत्वाचे नायक अशी ओळख असणाऱ्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर पक्षाने सोपवली आहे.
