खामगाव रेल्वे स्थानकावर आज सकाळपासूनच विठ्ठल भक्तांनी मोठी गर्दी केली होती. पंढरपूरला जाण्यासाठी उत्सुक असलेल्या भाविकांच्या चेहऱ्यावर उत्साह आणि भक्तीभाव ओसंडून वाहत होता. रेल्वे प्रशासनाने भाविकांच्या सोयीसाठी सर्व आवश्यक तयारी केली होती. पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छता आणि सुरक्षिततेची विशेष काळजी घेण्यात आली होती.
न्यूज 18 लोकमतचे प्रतिनिधी राहुल खंडारे यांनी काही भाविकांशी संवाद साधला. एका वृद्ध वारकऱ्याने सांगितले, "गेली अनेक वर्षे आम्ही पंढरपूरला पायी वारीला जातो, पण आता उतारवयामुळे रेल्वेने जाणे सोयीचे होते. रेल्वेने केलेली ही सोय आमच्यासारख्या अनेकांसाठी वरदान आहे." दुसऱ्या एका युवा भाविकाने सांगितले की, "कामामुळे वारीत चालत जाणे शक्य होत नाही, पण विठ्ठलाचे दर्शन घेण्याची ओढ असते. रेल्वेच्या या विशेष सेवेमुळे आम्हाला विठ्ठलाचे दर्शन घेता येत आहे, याचा खूप आनंद आहे."
advertisement
रेल्वे विभागाच्या या उपक्रमामुळे बुलढाणा जिल्ह्यातील आणि आसपासच्या परिसरातील हजारो भाविकांना पंढरपूरची वारी करणे सुलभ झाले आहे. या वर्षी दोन फेऱ्या उपलब्ध करून दिल्याने जास्तीत जास्त भाविकांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.