बीड : ऐन निवडणुकीत महायुती आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला धक्का देत मुंबई एपीएमसी मार्केट कमिटीचे अध्यक्ष अशोक डक यांनी बीडच्या माजलगाव मतदारसंघात अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. विशेष म्हणजे, त्यांनी आपल्याच उमेदवाराविरोधात वेगळी भूमिका मांडली आहे. त्यामुळे बीडच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
माजलगाव मतदारसंघात महायुतीचे राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार प्रकाश सोळंके यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अशोक डक यांनी रमेश आडसकर यांना पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि अजित पवार यांचे निकटवर्ती आणि धनंजय मुंडे यांचे विश्वासू म्हणून अशोक डक यांची ओळख आहे.
advertisement
रमेश हे माझे बालपणीचे मित्र आहे. मागे त्यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली होती. त्यावेळी त्यांना वेळ लागला होता. मी पक्षश्रेष्ठींना सांगितलं होतं. रमेश यांचाच प्रचार केला. त्यामुळे यावेळी रमेश यांना मी जाहीर पाठिंबा दिला आहे. मी कोणत्याही प्रकारची बंडखोरी केली नाही. मागील निवडणुकीत रमेश हा पराभूत झाले होते. पण तरीही त्यांनी माजलगाव मतदारसंघामध्ये प्रचंड काम केलं होतं. त्यामुळे ते मला या निवडणुकीत जवळचे वाटले आहे. त्यामुळे परिणामाची चिंता न करता निर्णय घेतला आहे, असंही अशोक डक म्हणाले.
'बालपणीच्या मित्राला मदत करायची म्हणून अशोक डक यांनी हा निर्णय घेतला आहे. पक्षाने कारवाई केली तरी हरकत नाही. पण यावेळेस अपक्ष उमेदवार रमेश आडसकर यांना निवडून आणणारच, असा विश्वास अशोक डक यांनी व्यक्त केला. अशोक डक हे मुंबई एपीएमसी मार्केट कमिटीचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे महायुतीला बीडमध्ये फटका बसण्याची शक्यता आहे.
