नाशिक महानगरपालिकेत मनसेच्या सत्ताकाळात आणि मागील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कालावधीत महापौर पद भूषवलेले अशोक मुर्तडक आणि उपमहापौर म्हणून काम पाहिलेले गुरमित बग्गा हे दोघेही त्या काळात शहराच्या विकासासाठी एकत्र काम करणारे सहकारी म्हणून ओळखले जात होते. मात्र, यंदाच्या महापालिका निवडणुकीत हेच दोन माजी पदाधिकारी एकमेकांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरल्याने राजकीय समीकरणे बदलली.
advertisement
माजी महापौर अशोक मुर्तडक हे मूळचे मनसेचे नेते होते. नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत भाजपकडून उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, भाजपने त्यांना उमेदवारी न दिल्याने त्यांनी बंडखोरीचा पवित्रा घेत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. पुढे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने त्यांना अधिकृत पाठिंबा दिला आणि ते शिंदेसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणुकीच्या मैदानात उतरले.
दुसरीकडे, माजी उपमहापौर गुरमित बग्गा यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप नेतृत्वाने त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना अधिकृत उमेदवारी दिली. त्यामुळे एका बाजूला शिंदेसेनेचा पाठिंबा असलेले माजी महापौर, तर दुसऱ्या बाजूला भाजपचे अधिकृत उमेदवार असलेले माजी उपमहापौर अशी थेट लढत रंगली.
