मिळालेल्या माहितीनुसार, संभाजीनगर डेपोची (एमएच २० बीएल ३०३५) ही बस संभाजीनगरहून जालन्याच्या दिशेनं जात होती. दरम्यान, ही बस कर्माडनजीक सटाणा फाट्याजवळ आल्यानंतर या बसला अपघात झाला. भरधाव वेगात असणाऱ्या या बसनं कंटेनरला (एमएच २०, डीई ९७८३) पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात बसच्या केबिनचं मोठं नुकसान झालं आहे. हा अपघात इतका भीषण होता की, बसचे काही भाग तुटून रस्त्याच्या बाजुला पडले.
advertisement
सुदैवाची बाब म्हणजे यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. केबिनचा चक्काचूर झाला असताना देखील चालक सुखरुप बचावला आहे. मात्र या अपघातात एकूण सात प्रवाशी जखमी झाले आहेत. सर्व जखमींना रुग्णवाहिकेतून स्थानिक रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. संभाजीनगर- जालना रस्त्यावर हा अपघात झाल्यानंतर काही काळासाठी वाहतूक सेवा मंद झाली होती.
सिंधुदुर्गात टेम्पोखाली चिरडून शाळकरी मुलीचा मृत्यू
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग येथे देखील अपघाताची एक घटना घडली आहे. दोडामार्ग तालुक्यातील झरेबांबर तिठा येथे भाजी वाहतूक करणाऱ्या टेम्पोनं एका सात वर्षीय शाळकरी मुलीला चिरडलं आहे. टेम्पो अंगावरून गेल्याने शाळकरी मुलीचा जागीच मृत्यू झाला.श्रिया संदीप गवस असं मृत पावलेल्या ७ वर्षीय मुलीचं नाव असून दोडामार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
