छत्रपती संभाजीनगर येथील मूर्तिकार शिवाजी गिरी यांनी लोकल 18ला दिलेल्या माहितीनुसार, मूर्ती तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल वेळेवर न मिळाल्याने मूर्तीकारांनी उशिरा कामाला सुरुवात केली आहे. यंदा कच्च्या मालाच्या दरवाढीमुळे मूर्तीच्या किमतीत 30 ते 35 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. मूर्तिकार गेल्या काही आठवड्यांपासून मूर्ती तयार करण्यात व्यग्र आहेत. गणरायाची एका सुबक आणि सुंदर मूर्ती तयार करण्यासाठी तिला 25 वेळा हाताळावी लागते. गिरी यांच्या मूर्तीशाळेतील 25 टक्के मूर्ती बुक झाल्या आहेत.
advertisement
शहरातील मूर्तिकार मागील काही आठवड्यांपासून अतिशय वेगात मूर्ती घडवण्याचं काम करत आहेत. यंदा शाडू मातीच्या मूर्तींना विशेष मागणी आहे. मात्र, विक्रेत्यांकडे शाडू मातीच्या मूर्तींची संख्या कमी आहे. परिणामी मंडळाकडून पीओपी मूर्तींची बुकिंग मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
मूर्तीकारांनी दिलेल्या माहितीनुसार, प्लॅस्टर ऑफ पॅरिस, शाडू माती, रंग, सजावट साहित्य यांसारख्या कच्च्या मालाच्या दरात मोठी वाढ झालेली आहे. याशिवाय कारागिरांची कमतरता असल्यामुळे उपलब्ध मजुरांना मजुरी वाढवून द्यावी लागते, वाहतूक खर्च आणि दुकानांचे भाडे ही द्यावे लागते. त्यामुळे मूर्तींच्या किमती देखील वाढतात. गेल्यावर्षी 1 हजार रुपयांना मिळणारी मूर्ती यंदा 1200 ते 1400 रुपयांना मिळण्याची शक्यता आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या सुमारे 170 ते 190 ठिकाणी मूर्तीशाळा कार्यरत आहेत. सातारा परिसर, गारखेडा, सिडको, औरंगपुरा, जयभवानीनगर यासह ग्रामीण भागात देखील विविध प्रकारच्या गणेशमूर्ती तयार केल्या जात आहेत. शाडू माती पुणे आणि गुजरातमधून आणावी लागते. तिचा दरही वाढलेला आहे. शिवाय कारागीर मिळत नसल्याने दरवाढ अनिवार्य असल्याचं मूर्तीकारांचं म्हणणं आहे.





