तर सध्याच्या घडीला गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटील यांच्यातील वाद एका इंजिनिअरच्या मृत्यूवरून सुरू झाला आहे. सांगलीच्या जत पंचायत समितीतील कनिष्ठ अभियंते अवधूत वडार यांचा १३ सप्टेंबर रोजी कृष्णा नदी पात्रात मृतदेह आढळला होता. प्रथमदर्शनी ही आत्महत्या वाटत होती. पोलिसांनी देखील तशीच नोंद केली. मात्र यानंतर वडार यांच्या नातेवाईकांकडून वडार यांनी आत्महत्या केली नाही. तर त्यांच्यासोबत घातपात झाल्याचा आरोप केला. तसेच जोपर्यंत संबंधितांवर कारवाई होणार नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेतला. पण त्यानंतर हे प्रकरण शांत झालं.
advertisement
याच इंजिनिअरच्या मृत्यू प्रकरणावरून गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटील यांच्यात जुंपल्याचं पाहायला मिळतंय. अवधूत यांच्या मृत्यूची घटना घडल्यानंतर त्यांची बहीण रवीना वडार यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात जाऊन आपल्या भावाने आत्महत्या केली नाही, तर त्यांचा घातपात झाला असा आरोप केला. अवधूत वडार यांना टेंडरची बिल काढण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर आणि त्यांचे स्वीय सहाय्यक, जिल्हा परिषदेचे सदस्य यांच्याकडून वारंवार त्रास दिला जात होता. एवढंच नाही तर आमदार पडळकर यांनी अवधूतला त्यांच्या कार्यालयात नेऊन दमदाटी देखील केल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळं मानसिक छळाला कंटाळुन अवधुत यांनी आत्महत्या केल्याचा आरोप वडार यांच्या कुटुंबांकडून केला. तसेच याप्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी करत वडार कुटुंबानं सांगली शहर पोलीस ठाण्याला थेट आत्मदहनाचा इशारा दिला.
इंजिनिअरच्या मृत्यूवरून पडळकरांनी जयंत पाटलांना टार्गेट का केलं?
मिळालेल्या माहितीनुसार, जत हा भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा मतदारसंघ आहे. तर मृत अभियंता मूळचे इस्लामपूर या जयंत पाटलांच्या मतदारसंघातले आहेत. त्यामुळे या सर्व प्रकरणात गोपीचंद पडळकर विरुद्ध जयंत पाटील हेच वडार कुटुंबाला फूस लावत आहेत, असा संशय गोपीचंद पडळकरांना आहे. यातूनच हा संघर्ष उफाळल्याचं सांगितलं जातंय. त्याचवेळी याप्रकरणात राष्ट्रवादीचे माजी आमदार विलासराव जगताप यांनीही पडळकरांच्या चौकशीची मागणी केलीय. तर काँग्रेसचे माजी आमदार विक्रम सावंत यांनी देखील मोर्चा काढत पडळकरांना घेरण्याचा प्रयत्न केला. यामुळे सांगलीतील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.
हे वडार आत्महत्या प्रकरण अंगाशी आल्यानंतर पडळकरांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आरोप फेटाळले. आपल्याला याप्रकरणात जयंत पाटलांकडून गोवलं जात असल्याचा पलटवारही पडळकरांनी केला. या सगळ्या घडामोडीनंतर गोपीचंद पडळकर यांनी संतापून थेट जयंत पाटलांचा बाप काढल्याचं समोर आलं. पडळकरांच्या याच विधानावरुन राज्यातील राजकारण तापलंय.