शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन, शेतमजूर, मच्छिमार यासह विविध घटकांच्या मागणीसाठी बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्या साथीला त्यांचे शेकडो कार्यकर्ते अन्नत्याग आंदोलनाला बसले आहे. आमची अंत्ययात्रा निघाली तरी बेहत्तर पण आम्ही मागे हटणार नाही, असा निर्धार बच्चू कडू यांनी बोलून दाखवला.
बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या काय?
advertisement
सरकारने घोषणा करूनही अद्यापही शेतकरी कर्ममाफीबद्दल पावले उचलली नाहीत. दिव्यांगांना सहा हजार द्यावेत, तसेच मेंढपाळ आणि मच्छिमारांसाठी वेगळे धोरण बनवले पाहिजे तसेच ऊस उत्पादक आणि तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी हमी भावावर २० टक्के एमएसपी देऊ, असे सरकारने सांगितले होते. मात्र हे आश्वासन देखील सरकारने पूर्ण केले नाही. युवकांच्या रोजगाराचा अतिशय मोठा प्रश्न असल्याने त्यांना भत्ता देण्यात यावा. तसेच घरकुलांना मिळणारा निधी अतिशय कमी देण्यात येतो, त्यात वाढ व्हावी. पहिला हफ्ता आल्यानंतर दुसऱ्या हफ्त्याला कित्येक महिने वाट पाहत बसावे लागते. चार पाच महिने वाट पाहत बसावे लागते. अंगणवाडीच्या सेविकांच्या मानधनाचा प्रश्न गेल्या सहा महिन्यांपासूनचा आहे. गेल्या सहा महिन्यांपासून अपंग श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांचे पैसे मिळत नाही. मात्र मंत्र्यांचे पगार पाच तारखेला होतात, कलेक्टर अधिकाऱ्यांचे पगार वेळेवर होतात. कष्टकऱ्यांना द्यायला मात्र शासनाकडे पैसे नाहीत.
पेरणी ते कापणीपर्यंत एमआरजीएसमध्ये कव्हर केले पाहिजेत. फळ उत्पादक शेतकऱ्यांना जसे तीन टक्के लागवडीसाठी मिळतात तसे उरलेल्या पाच वर्षांसाठी देखील त्याला एमआरजीएसमध्ये कव्हर केले पाहिजे, अशी मागणी देखील फळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी बच्चू कडू यांनी केली.
आमची अंत्ययात्रा निघाली तरी बेहत्तर....
सामान्य माणसाचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. सरकारने जर लक्ष दिले नाही, तर आम्ही आंदोलन अधिक तीव्र करू. आमची अंत्ययात्रा निघाली तरी बेहत्तर पण आम्ही मागे हटणार नाही, असा आक्रमक पवित्रा बच्चू कडू यांनी बोलून दाखवला.
