आमदार रवी राणा यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेऊन खासदार बळवंत वानखडे यांच्यावर टीका केली होती. नवनीत राणांचा पराभव हा अमरावतीचा पराभव नाही, तर विकासाचा पराभव असल्याचे ते म्हणाले होते. तसेच, 'देशात चांगली महिला खासदार होती', 'आताचे खासदार कुठे आहेत', 'त्यांचा पत्ता तरी कुणाला माहीत आहे का', 'त्यांनी एक तरी प्रश्न सोडवला का' असे अनेक प्रश्न विचारत त्यांनी वानखडे यांच्यावर टीकेची झोड उठवली होती.
advertisement
आमदार रवी राणा यांच्या टीकेला आता काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. नवनीत राणा यांच्या पराभवामुळे आलेल्या नैराश्यातून रवी राणा अशी टीका करतात, अशी खोचक प्रतिक्रिया वानखडे यांनी दिली.
या टीकेला उत्तर देताना खासदार बळवंत वानखडे म्हणाले की, रवी राणा हे त्यांच्या पत्नीच्या पराभवाच्या नैराश्यातून अजूनही बाहेर आलेले नाहीत. त्यामुळेच ते सातत्याने पराभवाची खंत व्यक्त करतात. गेल्या पाच वर्षांत नवनीत राणांनी काय काम केले? हे जनतेसमोर आहे. त्यामुळे त्यांनी (रवी राणा) अशा बालिश टीका करू नये. जिल्ह्यात शेतकरी संकटात असताना रवी राणा आणि पालकमंत्री दहीहंडी कार्यक्रमात व्यस्त होते. तेव्हा मी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यामुळे रवी राणा यांनी माझ्यावर बालिशपणे टीका करणे थांबवावे, असा जोरदार पलटवार वानखडे यांनी केला.