महादेव मुंडे हत्या प्रकरणात वाल्मिक कराड याचा सहकारी बाळा बांगर याने मोठे खुलासे केले आहेत. वाल्मिक कराड यानेच महादेव मुंडे प्रकरणातील प्रत्यक्षदर्शिला संपविल्याचा दावा त्याने केला.
महादेव मुंडे यांची हत्या झाल्यानंतर परळीतील धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावरून वाल्मिक कराडने पोलिसांना फोन केले. त्यानंतर या प्रकरणाचा तपास थांबला. १८ महिने होऊनही तपास लागलेला नाही, असा आरोप ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केला होता. गेल्या आठवड्यात बजरंग सोनवणे यांनी ज्ञानेश्वरी मुंडे यांची भेट घेऊन केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटतो, असा शब्द दिला होता.
advertisement
संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवार आजपासून सुरू झाले आहे. बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची वेळ मागितलेली आहे. ज्ञानेश्वरी मुंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना अनेक वेळा निवेदने दिली, उपोषणे केले, आंदोलन केली मात्र त्याचा काहीही फायदा झाला नाही. मागील आठवड्यात तर त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. पीडितांना न्याय देण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून मी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर प्रकरण सांगणार आहे, असे बजरंग सोनवणे म्हणाले.
अमित शाह यांच्या भेटीत आम्ही केवळ महादेव मुंडे हत्या प्रकरणच नाही तर बीडमधील अजूनही बरीच प्रकरणे मांडणार आहोत. बीडमधील खून अपहरण आदी विषय आम्ही त्यांच्यासमोर मांडून न्यायाची मागणी करणार आहोत, असे बजरंग सोनवणे म्हणाले.
महादेव मुंडे हत्या प्रकरणात आवश्यक ती कारवाई सुरू असून या प्रकरणात कोणालाही पाठीशी घालण्यात येणार नाही, असा शब्द मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत दिला. पोलिसांची चौकशी सुरू असून दोषींना सोडणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.
