माळेगाव नगरपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले, मात्र ते शक्य झाले नाही, अशी खंत व्यक्त करत त्यांनी स्थानिक मतदारांना भावनिक आवाहन केले. "तुम्ही माझे 18 उमेदवार निवडून द्या, मी बोललेलं सगळं करणार. पण, तुम्ही काट मारली की मी पण काट मारणार," असं स्पष्ट वक्तव्य त्यांनी केलं, ज्यामुळे सभेमध्ये एकच चर्चा रंगली.
advertisement
'अर्थ खाते माझ्याकडे, वाडपी तुमच्या समोर'
अर्थ खात्याच्या माध्यमातून मतदारसंघासाठी निधी आणण्यावर अजित पवार यांनी यावेळी खास शैलीत भाष्य केलं. "माझ्याकडे 1400 कोटीचं बजेट आहे. त्यातून तुम्हाला पैसे देईल. बारामतीत बाहेरून हजारो कोटींचा निधी आणला आहे. अर्थ खाते माझ्याकडे आहे. वाडपी तुमच्या समोर आहे. त्यामुळे ओळखीचा असल्यावर तो तुम्हाला जास्त वाढतो" असंही अजित पवार म्हणाले. मागील निवडणुकीतील कटुता विसरून नवी सुरुवात करण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.
"मागे झालं गेलं ते गंगेला मिळाले, आता नवी पहाट आहे. कुणीही संपत नसतो, संकुचित विचार करू नका. मन थोडं मोठं ठेवा," असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना आणि मतदारांना दिला. माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा उल्लेख करत त्यांनी कारखान्याचे करोडो रुपये वाचवल्याचे सांगितले. माळेगाव नगरपंचायतीच्या या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भारतीय जनता पार्टीच्या तावरे गटाने एकत्र येत स्थानिक आघाडी केली आहे. यामुळे अजित पवार गटाचे बरेच कार्यकर्ते नाराज झाले आहेत. त्यांनी अजित पवारांना न जुमानता निवडणूक अर्ज भरले होते. त्यानंतर अजित पवारांनी माळेगावमध्ये सभा घेत कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.
