निलेश इंगुले हे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे कट्टर कार्यकर्ते-माजी नगरसेवक. बारामती नगर परिषदेत त्यांना राष्ट्रवादीकडूनच लढायचे होते. मात्र कुठल्याशा कारणावरून वाद झाल्याने इंगुले यांनी राष्ट्रवादीपासून फारकत घेतली. निवडणुकीआधी वेगळे होत 'अंगाला गुलाल लागणारच' अशी गर्जना करून इंगुले यांनी राष्ट्रवादीला खुले आव्हान दिले. राष्ट्रवादीनेही आव्हान स्वीकारून इंगुले यांच्याविरोधात डावपेच आखले. त्यांच्या अंगाला गुलाल लागणार नाही, यादृष्टीने रणनीती आखली.
advertisement
बारामतीच्या अपक्ष नगरसेवकाने मार्केट जाम केलंय!
प्रभाग क्रमांक २० मधून निलेश इंगुले हे निवडणूक लढवत होते. अजित पवार यांनी स्वत: जातीने प्रभाग क्रमांक २० मध्ये लक्ष घालून उमेदवाराची निवड करण्यापासून ते रसद पुरविण्यापर्यंतचे नियोजन केले. परंतु सगळ्याला पुरून उरत इंगुले यांनी विजयी पताका फडकवली. इंगुले यांनी प्रभागात आपली ताकद दाखवून दिली. त्यांच्या विजयाची संपूर्ण बारामती शहरात जोरदार चर्चा होती. अजित पवार यांच्याशी पंगा घेऊन पठ्ठ्याने निवडणूक जिंकवून दाखवली, अशी चर्चा राष्ट्रवादीचे पदाधिकारीही करीत होते.
अजित पवारांची पंगा घेऊन नगरसेवक झाले!
एरवी एखाद्याला आमदार होऊ देणार नाही, अशी गर्जना करून अजित पवार खरोखर आपला शब्द सत्यात उतरवतात. पुरंदरचे विजय शिवतारे, शिरूरचे अशोक बापू पवार यांना अजित पवार यांच्या खुल्या आव्हानाचा अनुभव आहे. दुसरीकडे मात्र पवारांच्या बारामतीत त्यांच्याशी शत्रुत्व पत्करून इंगोले दणदणीत मतांनी निवडून आल्याने त्यांचे कौतुक होत आहे.
पवारांच्या बारामतीत सहा अपक्ष नगरसेवक
दुसरीकडे राष्ट्रीय समाज पक्षाच्या वनिता अमोल सातकर यांनीही पवारांच्या बारामतीचा अभेद्य गड भेदला. प्रभाग क्रमांक पाचमधून त्यांनी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्याच्या मुलीचा पराभव केला. अपक्ष असलेल्या मनीषा बनकर यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा अनिता गायकवाड यांचा पराभव केला. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या आरती शेंडगे गव्हाळे यांनीही बारामतीत विजयी तुतारी वाजवली. 'आमराई'मधून बसपाचे महासचिव काळुराम चौधरी यांची लेक संघमित्रा चौधरी यांनीही पहिल्याच प्रयत्नात विजयी सलामी दिली. त्यांच्या विजयाची देखील संपूर्ण तालुक्यात चर्चा आहे. पवारांचे कट्टर विरोधक लक्ष्मण हाके यांनी बारामतीत येत काळुराम चौधरी यांच्या साथीने पवार घराण्यावर हल्ले चढवून प्रचारात रंगत आणली. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत चौधरी यांचा पराभव झालेला असला तरी संघमित्रा यांच्या विजयाचा अत्यानंद त्यांना झाला.
