Beed News :सुरेश जाधव,बीड : बीडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. केज पोलिसांनी फिल्मी स्टाईल पाठलाग करून 50 लाख रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त केला आहे. यावेळी त्यांनी ट्रकच्या चालकासह अन्य एकाला देखील अटक केली आहे.या घटनेचा अधिक तपास सूरू आहे.त्यासोबत पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातून एक ट्रक गुटखा वाहून संभाजीनगरच्या दिशेन जात असल्याची माहिती केज पोलिसांना त्याच्या खास सुत्रांनी दिली होती. त्यानुसार पोलिसांनी टीम तयार केली होती आणि घटनास्थळी म्हणजे शहरातील चौकात पोलीस थांबले होते.
या दरम्यान गुटखा वाहून नेणारा ट्रक आला होता. पण ट्रक चालकाने पोलिसांना पाहताच आपला मार्ग बदलला.पोलिसांना देखील आरोपीने मार्ग बदलल्याचे लक्षात येतात त्यांनी त्याचा पाठलाग सूरू केला. यावेळी केज पोलिसांनी त्याचा फिल्मी स्टाईल पाठलाग केला होता. तब्बल दीड किलोमीटर पाठलाग केल्यानंतर पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला होता.
पण ट्रकमधील आरोपी फरार होते. आरोपींनी जवळच्या ऊसाच्या शेताचा आधार घेऊन पळण्याचा प्रयत्न केला.पण पावसामुळे आरोपींच्या शेतातल्या पाऊल खुणा स्पष्ट दिसत होत्या.त्यामुळे या पाऊलखुणांचा मागोवा घेत पोलिसांनी आरोपीला अटक केली. यावेळी पोलिसांनी 50 लाखांचा गुटखाही जप्त केली आहे.या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलीस करीत आहे.
पोलिस दलाची धडक मोहिम
बीड जिल्ह्यात अवैध दारू विक्री, हातभट्टी दारू तयार करण्याचे प्रकार, तसेच ढाब्यांवर बेकायदेशीर दारू विक्री यावर अंकुश ठेवण्यासाठी जिल्हा पोलिस दलाने धडक मोहीम राबवली आहे. जुलै महिन्यात राबवलेल्या मोहिमेत एकूण २३९ गुन्हे दाखल करत ५१ लाख १९ हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कारवाईदरम्यान देशी, विदेशी मद्य, हातभट्टीची दारू, बनावट रसायने, वाहने, उपकरणे व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. गावोगाव छापे टाकत हातभट्टी दारू तयार करणारे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले.शहरातील हॉटेल, ढाब्यांवर विनापरवाना विक्रीवरही पोलिसांनी धाड टाकत संबंधितांवर गुन्हे दाखल केले. एकूण २२९ आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले असून काहीजण अजूनही पोलिसांच्या रडारवर आहेत.
