DYSP आणि API साहेबांनी जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यात उड्या मारल्या
बीडच्या परळी तालुक्यातील कौडगाव हुडा-कासारवाडी रस्त्यावरील नदी प्रवाहात एक कार वाहून गेल्याने चार तरुण मध्यरात्री पुरात अडकले होते. यावेळी माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषिकेश शिंदे आणि शिरसाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ दहिफळे यांनी स्वतः आपला जीव धोक्यात घालत पूर्ण प्रवाहामध्ये उडी घेतली. या तरुणाला सुखरूप बाहेर काढले.
advertisement
मध्यरात्रीही पावसाचा जोर कायम असल्याने बचाव कार्यात अडथळे
रविवारी मध्यरात्री कौडगाव – कासारवाडी रस्त्यावर मारुती बलिनो गाडी पुरात वाहून गेली. ही घटना रविवारी रात्री ११:३० ते १२ वाजताच्या दरम्यान घडली असून या घटनेची माहिती स्थानिकांनी तत्काळ प्रशासनाला कळवली. यानंतर बचाव कार्य सुरू झाले. मध्यरात्रीही पावसाचा जोर कायम असल्याने बचाव कार्यात अडथळे निर्माण होत होते.
तिघे वाचले पण दुर्दैवाने एक जण मृत पावला
दरम्यान, या घटनेत वाहून गेलेल्या अमर मधुकर पौळ (वय २२) रा. डिग्रस, राहुल संपती पौळ (वय ३२), राहुल सटवाजी नवले (वय २२) रा. फुलारवाडी ता. पाथ्री या तिघांना सुखरूप बाहेर काढण्यात यंत्रणांना यश आले असून विशाल बल्लाळ (वय २४) रा. बोरी सावरगाव ता. केज हा तरुण मयत झाला असून त्याचा मृतदेह सिरसाळा येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
