बीड : धक्का लागल्यामुळे बीडमधल्या टोळक्याने विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली आहे. तसंच विद्यार्थ्याला वाचवण्यासाठी आलेल्या चुलत भावाचे डोकंही टोळक्याने फोडले आहे. वर्गात जात असताना धक्का लागला, त्यानंतर विद्यार्थ्याने माफीही मागितली, तरीही नववीच्या विद्यार्थ्याचा इगो हर्ट झाला, यातून त्याने आपल्याच वर्गातील विद्यार्थ्याला मारण्यासाठी गल्लीतील 10-15 मित्र बोलवून घेतले. यानंतर टोळक्याने विद्यार्थ्याला फायटर आणि रॉडने मारहाण केली.
advertisement
मारहाण सुरू असल्याचं पाहून विद्यार्थ्याचा चुलत भाऊ त्याला वाचवण्यासाठी आला, तेव्हा टोळक्याने त्याचंही डोकं फोडलं. मारहाण झालेले दोघेही वाचण्यासाठी शिक्षकांच्या स्टाफ रुममध्ये पळाले, मात्र टोळक्याने तिथे जाऊनही धुडगूस घातला. या हल्ल्यामध्ये 3 प्राध्यापकही किरकोळ जखमी झाले आहेत. टोळक्याने हल्ला करताच शिक्षकांनी पोलिसांना बोलवून घेतलं. पोलीस आल्याचं लक्षात येताच टवाळखोर तिथून पळून गेले.
बीडच्या एका शाळेमध्ये हा सर्व प्रकार घडला आहे. या घटनेमध्ये दोन विद्यार्थी जखमी झाले असून बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रेम बबन जोगदंड (वय 19) आणि विनीत विकास जोगदंड (वय 14) अशी हल्ल्यात जखमी झालेल्या मुलांची नावं आहेत. विनीत हा नववीमध्ये शाळेत त्याच्याच वर्गात शिकत असलेल्या मुलाला विनीतचा धक्का लागला, यानंतर विनीतने त्याची माफीही मागितली, पण धक्का लागलेल्या मुलाला राग आला. शाळा सुटल्यानंतर त्याने विनीतला मारहाण सुरू केली.
विनीतचा चुलत भाऊ प्रेम हा चौथीत शिकत असलेल्या त्याच्या लहान भावाला घेण्यासाठी आला होता, तेव्हा प्रेमने विनीतला मारहाण होत असल्याचं पाहिलं आणि तो विनीतला वाचवायला गेला, पण टोळक्याने विनीतसोबत प्रेमलाही मारायला सुरूवात केली. पोलिसांनी विनीत आणि प्रेमला मारहाण करण्यासाठी वापरलेले फायटर जप्त केले आहे. आरोपींना लवकरच पकडले जाईल, असं पोलीस म्हणाले आहेत.
