सोलापूर : बार्शी तालुक्यातील सासुरे येथे एका युवकाने स्वत:च्या डोक्यात गोळी मारून घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दीड वर्षापासून प्रेम करणाऱ्या प्रेयसीच्या घरासमोरच गाडीत बसून मध्यरात्रीच्या सुमारास गोळी मारून घेतल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील गोविंद जगन्नाथ बर्गे असे गोळी मारून घेतलेल्या युवकाचे नाव आहे.
advertisement
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा पदाधिकारी आणि लुखामसला गावचे माजी उपसरपंच असल्याचं समोर आला आहे. सदर गोविंद बर्गे याचं वैराग जवळील सासुरे येथील एका नर्तिकेसोबत प्रेम प्रकरण होते. गोळीबार झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली असून घटनास्थळी बार्शीचे उपविभागीय अधिकारी अशोक सायकर यांच्यासह वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांची टीम दाखल झाली आहे.
चार-पाच दिवसापासून दोघात भांडणे
गेवराई तालुक्यातील गोविंद जगन्नाथ बर्गे हे प्लॉटिंगचे व्यवसाय करतात, चांगला व्यवसायात जम बसलेला असतानाच त्यांचा संपर्क पारगाव कलाकेंद्रातील नर्तिकेशी संबंध आला. त्यानंतर दोघांची जवळीक वाढली आणि प्रेमसंबंध सुरू झाले. गोविंद बर्गे यांनी सोन्या नाण्यांसह अनेक महागड्या गोष्टी पुरवल्या होत्या. मागील काही दिवसांपूर्वीच सुमारे पावणे दोन लाख रुपयांचा एक मोबाईल देखील तिला घेऊन दिला होता. मात्र गेल्या चार-पाच दिवसापासून दोघात भांडणे सुरू होते.
चारचाकीने प्रेयसीच्या घरासमोर
गोविंद हा सासुरे येथे चार चाकी गाडीमधून सोमवारी मध्यरात्री मुलीच्या घरासमोर आल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यानंतर तिच्या घरासमोरील कॅनल जवळ चारचाकीमध्ये गोविंद हा रक्ताच्या थारोळ्यात पाहायला मिळाला. त्यानंतर पोलीस पाटील यांनी वैराग पोलिसांना याबाबतीत माहिती दिली. नातेवाईकांशी संपर्क केल्यानंतर सर्व प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वैराग पोलीस पुढील तपास करत आहेत.