बीड कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांच्यावरील आरोपांनी पोलीस खात्यात खळबळ माजली होती. गृहखात्याने गायकवाड यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी बीडमध्ये पार पडलेल्या हिंदू मोर्चातून करण्यात आली. मोर्चाच्या काही तासांतच त्यांची उचलबांगडी करून नागपूर उपअधीक्षकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पेट्रस गायकवाड यांची उलचबांगडी, नागपूरला बदली
बीडच्या कारागृह अधीक्षक म्हणून नेमणूक झाल्यापासून या ना त्या कारणाने पेट्रस गायकवाड कायम वादाच्या केंद्रस्थानी राहिले. कारागृहातील झाडे तोडणे, कैद्यांकडून खासगी कामे करून घेणे असे आरोप त्यांच्यावर होते. यासोतच तुरुंगातून सुटलेल्या एका आरोपीच्या दाव्यानुसार तुरुंगात सक्तीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न होत असून खुद्द कारागृह अधीक्षकच त्यासाठी प्रयत्न करीत असल्याचा सनसनाटी आरोप संबंधित आरोपीने केला होता.
advertisement
बीड कारागृहातील कैद्यांच्या वकिलांनी तक्रारी केल्या होत्या. गृह विभागाने तत्काळ दखल घेऊन कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांची उलचबांगडी करण्याचा निर्णय घेतला. त्यांची अवनती (डिमोशन) करून त्यांची नियुक्ती नागपूरच्या पोलीस उपअधीक्षकपदी करण्यात आली आहे.
जनआक्रोश मोर्चाला काही तास उलटत नाही तोच गायकवाड यांच्यावर कारवाई
पेट्रस गायकवाड यांनी बीड कारागृहात छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या भेटीचा फोटो हटवून तिथे बायबलशी संबंधित गोष्टी लिहिल्या, असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला होता. जनआक्रोश मोर्चाला काही तास उलटत नाही तोच गायकवाड यांच्यावर बदलीची कारवाई करण्यात आली आहे.
जामिनावर बाहेर आलेल्या आरोपीचा खळबळजनक दावा
धर्मांतर केले तर गुन्ह्यातून सोडवतो, पैसे देतो, असे गायकवाड यांनी आम्हाला सांगितले. आम्ही नकार दिल्यावर त्यांनी आम्हाला मारहाण केली, जेवण दिले नाही. आमची दाढी आणि केस कापायला लावले. तुरुंगातल्या भजन, आरती आणि प्रार्थना बंद केल्या, असे जामिनावर बाहेर आलेला आरोपी कल्याण वासुदेव भावले याने सांगितले.