Beed News : बीड,सुरेश जाधव : देशासह महाराष्ट्रात उद्या 9 ऑगस्टला रक्षाबंधन हा सण साजरा केला जाणार आहे. या सणाची बहिण भावांमध्ये उत्सुकता असतानाच बीडमध्ये पोलिसांनी एका बहिणीला रक्षाबंधनाआधीच अनमोल भेट दिली आहे. या बहिणीचा सात वर्षापूर्वी हरवलेला मुलगा शोधून काढत त्यांनी तिला परत करून ही भेट दिली आहे. आणि ज्यावेळेस बीडच्या पोलीस अधिक्षक कार्यालयात या मायलेकाची भेट झाली. ही भेट पाहून अख्खं कार्यालय रडलं होतं. त्यामुळे रक्षाबंधनाआधी पोलिसांनी एका बहिणीला दिलेल्या भेटीची खूप चर्चा होतेय.
advertisement
बीडच्या वडवणी तालुक्यातील खळवट निमगावमध्ये माळी कुटुंब बऱ्याच वर्षापासून राहतं. या कुटुंबात राहणारा राजू काकासाहेब माळी हा मुलगा घर सोडून निघून गेला होता. या प्रकरणी माळी कुटुंबियांनी पिंपळनेर पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर बरीच वर्ष लोटली पण मुलाचा शोध काय लागला नव्हता. त्यामुळे आई प्रचंड चिंतेत होती. कुटुंबियातील काही लोकांनी तर आशा देखील सोडली होती.
पण आज रक्षाबंधनाच्या पुर्वसंध्येला पोलिसांनी राजू माळीला हुडकून काढत तिच्या कुटुंबियांना मोठी भेट दिली आहे. तब्बल 7 वर्षानंतर अपहरण झालेला राजू सापडला होता.यावेळी मायलेकाची भेट पाहण्यासारखी होती.
पोलिसांनी राजू माळी सापडल्यानंतर माळी कुटुंबियांना या घटनेची माहिती दिली होती.यानंतर माळी कुटुंबीय बीडच्या पोलीस अधिक्षक कार्यालयात पोहोचले होते.यावेळी पोलिस अधिक्षक नवनीत कावत यांच्या कार्यालयात माळी कुटुंबिय बसलेले असताना राजू माळी याला बोलावण्यात आले होते. यावेळी त्याच्या आईने त्याला पाहताच तिचे अश्रू अनावर झाले आणि ती त्याच्या गळ्यात पडून रडली. आईसोबत मुलाचा भाऊ आणि वडिलांना देखील अश्रू रोखता आले नाही.
तसेच मायलेकाची तब्बल 7 वर्षानंतर झालेली ही भावनिक भेट पाहता पोलिसांचे देखील डोळे पाणावले होते. त्यामुळे रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर पोलिसांनी महिलेला तिच्या मुलाला परत करून मोठी भेट दिली आहे.या भेटीची आता सर्वत्र चर्चा रंगली आहे.
